मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा एक आजार नसून आजारांचा गट आहे. अनुवांशिक बदलांमुळे स्नायूंच्या आरोग्यासाठी आवश्यक असणार्या प्रथिनांची निर्मिती व्यवस्थित होत नाही. परिणामी स्नायूंची ताकद कमी होते, स्नायू रुक्ष होतात आणि रुग्ण क्रमाक्रमाने दैनंदिन जीवनातील साध्या गोष्टी करण्यासही असमर्थ ठरतो.
डॉ. संजय गायकवाड
स्नायू हे आपल्या शरीराचे आधारस्तंभ आहेत. चालणे, धावणे, श्वास घेणे, बोलणे, अगदी दैनंदिन जीवनातील सर्व हालचाली या स्नायूंमुळेच शक्य होतात; परंतु काही अनुवांशिक कारणांमुळे हेच स्नायू हळूहळू कमकुवत होऊ लागतात आणि अखेरीस साधीशी शारीरिक हालचालही अशक्य होते. या विकाराला वैद्यकीय भाषेत ‘मस्क्युलर डिस्ट्रॉफी’ असे म्हटले जाते. सुमारे 30 हून अधिक प्रकारचे स्नायू-दुर्बलता विकार यामध्ये समाविष्ट आहेत. त्यांचे स्वरूप, लक्षणे व परिणाम मात्र वेगवेगळा असतो.
या विकाराचे स्वरूप बालपणापासून वृद्धापकाळापर्यंत कोणत्याही टप्प्यावर दिसून येऊ शकते. काही प्रकार जन्मत: आढळतात, तर काही बालपण, तरुणपण किंवा मध्यम वयात उघड होतात. यांपैकी सर्वाधिक चर्चेतला प्रकार म्हणजे ड्युशेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी. तो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळतो आणि लक्षणे साधारणपणे तिसर्या ते सहाव्या वर्षी दिसू लागतात. यामध्ये मुलांनाच जास्त बाधा होते आणि विकार अत्यंत तीव्र स्वरूपाचा असतो. बेकर मस्क्युलर डीस्ट्रॉफी हा तुलनेने सौम्य असला तरी हळूहळू वाढत जातो व किशोरवयीन अवस्थेत प्रकट होते. काही मुले जन्मत:च काँजेनिटल मस्क्युलर डिस्ट्रॉफी घेऊन येतात. यामुळे त्यांच्या बालपणावर मोठा परिणाम होतो. तसेच फेशिओ-स्कॅप्युलो-ह्युमरल डिस्ट्रॉफी हा प्रकार चेहरा, खांदे आणि वरचे हात यांच्या स्नायूंना बाधा करतो आणि किशोरवयीन टप्प्यात दिसून येतो.
मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा पूर्णपणे अनुवांशिक विकार आहे. आपल्या स्नायूंचे संरक्षण करणारे व त्यांना सक्षम ठेवणारे काही विशिष्ट प्रोटिन्स तयार करणार्या जीनमध्ये बदल (म्युटेशन) झाल्यामुळे ही स्थिती निर्माण होते. हे बदल आई-वडिलांकडून मुलाकडे येऊ शकतात, तर कधीकधी पहिल्यांदाच एखाद्या पिढीत हा बदल घडतो.
सामान्यतः दिसणारा अशक्तपणा किंवा चपळतेचा अभाव आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी यामध्ये फरक करणे कठीण असते; परंतु मुलाच्या चालण्यात, उठण्या-बसण्यात, पायर्या चढण्यात जर सतत अडथळे जाणवत असतील, जर तो वारंवार पडत असेल, जर शरीर ‘फ्लॉपी’ वाटत असेल तर पालकांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. कारण लक्षणे जितक्या लवकर ओळखली जातात, तितक्या लवकर उपचारपद्धतींचा लाभ मिळू शकतो. भारतात ग्रामीण भागात तर या आजाराविषयी माहितीच नसल्याने निदान उशिरा होते. अनेक पालक मुलाच्या वारंवार पडण्याला किंवा विकासातील उशिराला शारीरिक कमकुवतपणा मानतात. डॉक्टरांपर्यंत पोहोचेपर्यंत आजार पुढे सरकलेला असतो.
आजघडीला मस्क्युलर डिस्ट्रॉफीवर संपूर्ण इलाज उपलब्ध नाही. तरीही काही उपचारपद्धती व थेरपींमुळे आराम मिळू शकतो. यामध्ये फिजिओथेरपी स्नायू लवचिक ठेवण्यास मदत करते. ऑक्युपेशनल थेरपीद्वारे दैनंदिन कौशल्ये पुन्हा शिकण्यास मदत होते. रेस्पिरेटरी केअर हे श्वसनाच्या तक्रारींसाठी उपयुक्त ठरते. याखेरीज स्पीच थेरपी ही बोलणे सुधारण्यासाठी केली जाते. या रुग्णांसाठी व्हीलचेअर, ब्रेसिस, वॉकर यामुळे गतिशीलता वाढते. वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने संशोधन सुरू आहे. जनुक थेरपी, स्टेम सेल थेरपीसारखे प्रयोगात्मक उपचार भविष्यात आशेचा किरण ठरू शकतात. पण तोपर्यंत नियमित व्यायाम, योग्य आहार, वेळेवर तपासण्या, पूरक साधने आणि तज्ञांच्या सल्ल्याने जीवनाची गुणवत्ता वाढविणे हा एकमेव मार्ग आहे.