

शिरोली एमआयडीसी : नागांव ता. हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या मार्फत पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाण्याला पेट्रोलजन्य पदार्थासारखा वास ( दुर्गंधी ) येत आहे. या दुषित पाण्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे . याबाबत पुलाची शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने ग्रामपंचायत व संबंधित फरसाण कंपनीस लेखी नोटीस बजावून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल असे खडे बोल सुनावले आहेत. ग्रामपंचायतीने पाण्याची दुर्गंधी व पाणी दुषित कशामुळे झाले आहे याचा तपास करणे गरजेचे असताना मात्र शेतातील पिकांवर औषध फवारणी केल्याचे कारण देत विषयाला बगल देण्याचे काम करत आहे . यातून कोणाला पाठीशी घातले जात आहे ? याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
हातकणंगले तालुक्यातील नागाव हे गाव २० हजार लोकसंख्येचे असून गावचा विस्तार जवळपास ५ ते ६ किलोमिटर पसरला आहे .गावास दोन भागात पिण्याच्या पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले असून नागाव फाटा , डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, खणाईदेवी नगर, इंदिरा झोपडपट्टी तर गावभागास एका स्वतंत्र्य विहिरीतून पिण्याचा पाणी पुरवठा केला जातो. तर गावभागास एका विहिरीतून पाणी पुरवठा करण्यात येतो. गावभागास पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या विहिरीजवळ फरसाणा कंपनी असल्याने तेथे दररोज अनेक अवजड ट्रक येथील मालाची वाहतूक सुरू असते. अशाच माल घेवून आलेल्या एका ट्रकची डिझेल टाकी लिकीज झाल्याने यातील सर्व डिझेल विहिरीत गेले अशी माहिती समोर येत आहे .
पण याबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व कर्मचारी याना विचारणा केली असता विहिरीच्या आजूबाजूला शेती असल्याने शेतातील पिकावर औषध फवारणी केली असल्याने ते पावसाच्या पाण्यातून विहीरीत झिरपत आहे त्यामुळे पाण्याचा वास येत आहे असे सांगितले जात आहे .
ग्रामपंचायतीने आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांना सोबत घेवून गावातील नागरिकांच्या आरोग्याबाबत तपासणी करणे गरजेचे आहे. शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राने ही गंभीर बाब लक्षात घेवून ग्रामपंचायत , फरसाणा कंपनीचे मालक व उपकेंद्रातील ( आरोग्यवर्धिनी ) याना या पाण्यावरून साथ उद्भवल्यास आपणास जबाबदार धरण्यात येणार असल्याचे परिपत्रकातून सांगण्यात आले आहे . हा नागरिकांच्या आरोग्याशी निगडित प्रश्न असल्याने ग्रामपंचायत व संबंधित फरसाण कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.