[author title="सोनाली जाधव" image="http://"][/author]
मासिक पाळी म्हटलं की आजही लोकांच्या भूवया उंचवताना दिसतात. कुजबूज केली जाते. आजही स्त्रीच्या मासिक पाळीचे महिन्यातील 'चार-पाच' दिवस तिच्यापुरते मर्यादित राहिलेले आपण पाहतो. आज जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन. २८ मे रोजीच मासिक पाळी स्वच्छता दिन (Menstrual Hygiene Day) का साजरा केला जातो? हे आपण समजून घेवूया.
आज २८ मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन. आपण आपल्या आजुबाजूला पाहिलं की लक्षात येईल मासिक पाळी म्हटलं की, "तेरी भी चूप और मेरी भी चूप" असंच काहीस वातावरण पाहायला मिळतं. आजही आपल्याकडची परिस्थिती पाहता मासिक पाळीवर जाहीरपणे बोलणं टाळलं जातं. परिस्थिती बदलतेय मासिक पाळीच्या संदर्भात काहीजण उघडपण बोलायला लागले आहेत; पण ही परिस्थिती खूप ठिकाणी पाहायला मिळते. बऱ्याच स्त्रियांच्या आयुष्यात महिन्यातील मासिक पाळीचे दिवस तिच्यापुरते मर्यादित राहून जातात.
बहुतांश महिला आणि पुरुष आजही मासिक पाळीच्या संबधित माहितीबद्दल अनभिज्ञ आहेत. मासिक पाळी आल्यानंतर घ्यावयाची काळजी, पाळी येण्याअगोदर आणि नंतर आपल्या शरीरात होणारे बदल, मानसिकतेत होणारे बदल, आजार याबद्दल माहिती नाही किंवा अपुरी आहे. ही परिस्थिती फक्त ग्रामीण भागातच आहे का? तर अजिबात नाही. शहरातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. महिलांनी मासिक पाळीच्या दिवसात कशी स्वच्छता घ्यायची याबद्दल माहिती मिळावी, त्यांच्यात जागरूकता वाढावी यासाठी हा दिन मे महिन्याच्या २८ तारखेला साजरा केला जातो. हा मे महिन्याच्या २८ मे राेजीच (Menstrual Hygiene Day) का साजरा करतात हे जाणून घेण तितकचं गरजेच आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या २८ तारखेला 'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन' (World Menstrual Hygiene Day) साजरा करतात. पहिल्यांदा २०१४ मध्ये मध्ये एका एनजीओने मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करण्यास सुरुवात केली. साधारणत:, महिलांच्या मासिक पाळीचे चक्र हे २८ दिवसांचे असते. मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव हा साधारणपणे ४ ते ५ दिवस होत असतो. म्हणूनच हा दिवस इंग्रजी वर्षातील पाचव्या महिन्याची म्हणजे मे महिन्याच्या २८ तारखेलाच साजरा करतात.
आजही मासिक पाळीच्यादरम्यान स्वच्छता कशी घेतली पाहिजे, याबद्दल महिलांना म्हणावी तशी माहिती नाही. कधी-कधी महिला लाजून पाळीदरम्यान वापरलेले कापड कोण पाहणार नाही अशा ठिकाणी सुकत घालतात, जर पॅड वापरत असतील तर कोण पाहणार नाही याची काळजी घेत ते पॅड घाईगडबडीत टाकताना दिसतात. पण मासिक पाळीच्या दरम्यान जी काही साधने वापरतात ती त्याबद्दल माहिती असणं आणि त्याची स्वच्छता कशी राखली पाहिजे याबद्दल माहिती असणं गरजेच असते.
मासिक पाळी संबंधित मुलींशी आरोग्यसंवाद करणारे योगेश सुवर्णा आनंदा म्हणतात, "मासिक पाळी या विषयावर शाळेमध्ये मुलींशी जेव्हा बोलणं होतं, तेव्हा लक्षात येते की, पाळी येण्यापूर्वी त्यांना कुणीही माहिती दिलेली नसते. तर पाळी आल्यानंतर ज्यावेळेस त्यांना माहिती दिली जाते, बऱ्यापैकी ती अवैज्ञानिक, चुकीची आणि अंधश्रद्धांना खतपाणी घालणारी असते. त्या पाठीमागचे विज्ञान समजावून देण्याऐवजी, 'आता तू मोठी झालीस' आता हे करायचं नाही, ते करायचं नाही, अशी बंधनेच जास्त लादली जातात. पाळी विषयीच्या अंधश्रद्धा न पाळता त्या काळात घ्यावा लागणारा आहार, स्वच्छता, व्यायाम इत्यादी सर्व गोष्टींची माहिती त्यांना त्यांच्या घरातून किंवा शाळेतून मिळणं खूप गरजेचे आहे".
हेही वाचलंत का?