कमी वयातच मुलींना मासिक पाळीचा त्रास, कारणे काय? | पुढारी

कमी वयातच मुलींना मासिक पाळीचा त्रास, कारणे काय?

श्रद्धा कांदळकर

ठाणे : मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचे विशिष्ट वय असते. विशिष्ट वयात मासिक पाळी आली तर त्याला आपण नैसर्गिक चक्र असे म्हणतो. मात्र, सध्याच्या काळात मासिक पाळी येण्याचं वय घटत असून, साधारणतः वयाच्या 10 व्या वर्षाच्या आतच मासिक पाळी येण्याचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील बदल, बाहेरचे जंकफूड, शरीरात आलेला स्थूलपणा, कमी वयातील शरीरसंबंध अशी अनेक कारणे यामागे असल्याचे या विषयातील तज्ज्ञ सांगतात. मात्र, मासिक पाळी लवकर आल्याने मुलींमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढले असून, याचा कमी वयातील मुलींच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

आपल्या देशात मुलींना पाळी साडेदहा ते चौदा वर्षांच्या दरम्यान येते. जर पाळी दहा वर्षांच्या आत आली तर त्याला पाळी लवकर येणं असे म्हणतात.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, थायरॉईड हार्मोन्समध्ये असंतुलन झाल्यास, मेंदूमध्ये पिच्युरटी ग्रंथीत जर गाठ झाली किंवा ट्युमर झाला तरी पाळी लवकर येते. किडनीच्यावर ड्रिनल ग्रंथीमध्ये जे हार्मोन्स तयार करण्याची जी क्षमता असते त्यात बदल झालेला असतो. त्यामुळेही पाळी लवकर येऊ शकते. मुलींच्या अंडाशयाशी निगडित काही आजार असल्यास मासिक पाळी वेळेआधीच येते.

मात्र आता याव्यतिरिक्त अनेक कारणे समोर आली आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे येणारा स्थूलपणा आता लहान मुला-मुलींमध्ये देखील पाहायला मिळतो. एकूण वजनाच्या 66 टक्के शरीरात फॅटस् वाढले की पाळी येते. म्हणूनच खूप बारीक मुलींना पाळी वेळेत येत नाही. उशिरा येते. शरीरात फॅटसचं हे प्रमाण हे 11 ते 14 या वयोगटात होतं. मात्र, स्थूल मुलींमध्ये चरबीचं प्रमाण हे जर त्याआधीच वाढलेलं असेल तर पाळी लवकर येते. सामान्यत: स्थूलता नसली, पण शारीरिक हालचाल कमी असली तरी पाळी लवकर येते.

ठाण्यातील प्रसिद्ध स्त्रीरोग आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. महेश बेडेकर यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी जी मासिक पाळी वयाच्या 11 ते 12 वर्षानंतर येत होती ते वय कमी होऊन मासिक पाळी आता 9 ते 10 वयात येते. यामध्ये सामाजिक पर्यावरणीय बदलदेखील महत्त्वाचे आहेत. मुलींच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. बाहेरचे जंकफूड वाढले आहे. इंटरनेटमुळे देखील हार्मोन्स बदलतात. व्यायाम केला जात नाही. दुसरीकडे इंटरनेटमुळे ज्या गोष्टी ज्या वयात कळायला नको त्या गोष्टी कमी वयात कळायला लागल्या आहेत. सध्याच्या मुलांमधील निरागसता निघून गेली आहे. अभ्यास आणि स्पर्धांमुळे मुलींवर ताण वाढला आहे. जो सामाजिक बदल पश्चात देशात दिसू लागला, तो बदल आता आपल्या देशात दिसू लागला आहे. या सर्व गोष्टीचा पालकांनी नक्की गंभीरपणे विचार करायला हवा.

हे आजार होऊ शकतात…

लवकर पाळी आलेल्या मुलींना कमी वयात रक्तदाब, मधुमेह होण्याची शक्यता असते. या मुलींमध्ये पुढे हृदयविकाराचा धोका, अर्धांग वायू किंवा ब्रेन स्ट्रोक येणे याचा कमी वयात धोकाही असतो. लवकर पाळी आल्यास मुलींची उंची वाढत नाही. उंची वाढण्यास अडथळे येतात. लवकर मासिक पाळी येण्याचे त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. मासिक पाळी लवकर आल्याने या परिस्थितीशी जुळवून घेण्याइतका समजूतदारपणा मुलींमध्ये आलेला नसतो. वयाच्या 7-8 व्या वर्षीच पाळी आली तर मुलींमध्ये अल्लडपणा असतो. त्यानुसार याच वयोगटाच्या बाकीच्या मुली मस्त हसत खेळत बागडत असतात आणि आपल्याला मात्र हे असं काहीतरी होतंय हे जाणवून मुलींमध्ये न्यूनगंड निर्माण होतो.

काय काळजी घ्यायला हवी?

1. मुलींच्या शारीरिक हालचालीसाठी मुलींनी कमीत कमी 1 तास तरी रोज खेळायला हवं.
2. पोषणयुक्त घरचा आहार मुलींना मिळणं आवश्यक आहे.
3. अन्नपदार्थ साठवण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर कमी करावा. सोशल मीडिया बघणं, गेमिंग, मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर चित्रपट बघणं यामुळे तासन्तास कॉम्प्युटर समोर बसणं होतं. असं झाल्यास कॉम्प्यूटरच्या ऑरेंज लाईटचा परिणामही हार्मोन्सवर होतो, हे अभ्यासात आढळून आलं आहे. त्यामुळे मुलींचा स्क्रीन टाईम कमी करणं गरजेचं आहे.
मुलींनी 7 ते 8 तास व्यवस्थित झोप घेणं आवश्यक आहे.

Back to top button