प्रातिनिधिक छायाचित्र.  Pudhari
आरोग्य

Malaria Vaccine : मलेरियाच्या लसीच्या किमतीत ४० टक्क्यांनी कपात, जगभरात आणखी १० लाख चिमुकल्यांना मिळणार सुरक्षा कवच

बाल लसीकरण कार्यक्रमांचे तब्बल सुमारे ४१६ कोटी रुपयांची बचत होणार

पुढारी वृत्तसेवा

Malaria vaccine price drop Bharat Biotech Mosqivac

‘गॅव्ही’ (Gavi - द व्हॅक्सीन अलायन्स) आणि युनिसेफ (UNICEF) यांच्यात झालेल्या करारांतर्गत मलेरियावरील लसीची किंमत थेट ४० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. ही कपात २०२७ च्या सुरुवातीपासून लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२७ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीत बाल लसीकरण कार्यक्रमांचे तब्बल ५ कोटी डॉलर (सुमारे ४१६ कोटी रुपये) वाचतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्पादनाच्या आवश्यक चाचण्या आणि शासकीय मान्यतांच्या प्रक्रियेनंतर ही कपात लागू होईल.

मलेरियाची लस का महत्त्वाची?

मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा प्राणघातक आजार आहे. लहान मुलांमध्ये याची लागण झाल्यास स्थिती गंभीर होऊन त्यांचा जीव जाण्याचा मोठा धोका असतो. वर्षानुवर्षांच्या संशोधनानंतर २०२१ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बालकांसाठी 'RTS,S/AS01' या पहिल्या मलेरिया प्रतिबंधक लसीच्या व्यापक वापरास मान्यता दिली होती. ही लस जीएसके (GSK), पाथ (PATH) आणि त्यांच्या भागीदार संस्थांनी विकसित केली आहे. विशेष म्हणजे, या लसीचा जगभरात तुटवडा भासू नये आणि पुरवठा वाढावा यासाठी भारतातील 'भारत बायोटेक' (Bharat Biotech) ही कंपनी आता या लसीचे उत्पादन सांभाळणार असून ती 'मॉस्कीव्हॅक' (Mosqivac) या नावाने बाजारात आणली जाईल.

ही लस किती प्रभावी आहे?

'RTS,S/AS01' लसीचे एकूण चार डोस दिले जातात. युनिसेफने दिलेल्या माहितीनुसार, मलेरियाचा प्रादुर्भाव विशिष्ट हंगामात जास्त असलेल्या भागांमध्ये मुलांचे वेळेत संपूर्ण लसीकरण झाले, तर मलेरियाच्या प्रकरणांमध्ये सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत घट दिसून येते.मात्र, ही लस १००% संरक्षण देत नाही. त्यामुळे लसीकरणासोबतच डासदाण्यांचा वापर, डास प्रतिबंधक उपाय आणि ताप आल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणे तितकेच गरजेचे आहे.

किमतीतील कपातीचा काय फायदा होईल?

लसीचे दर कमी झाल्यामुळे जगभरातील देशांना त्यांच्या आरोग्य बजेटमध्येच अधिक बालकांपर्यंत ही लस पोहोचवणे शक्य होणार आहे. पुढील तीन वर्षांत वाचणारे ५ कोटी डॉलर (सुमारे ५० दशलक्ष डॉलर) १० लाखांहून अधिक अतिरिक्त मुलांना लसीचे चारही डोस देण्यासाठी वापरले जाऊ शकतात. तसेच या निधीतून इतर महत्त्वाच्या लसींचा पुरवठा वाढवणे देशांना शक्य होईल.

लसीला अपेक्षापेक्षा अधिक मागणी

२०२४ मध्ये ही लस प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यापासून तिला अपेक्षेपेक्षा जास्त मागणी दिसून आली आहे. युनिसेफनुसार, आतापर्यंत ७ कोटी ४० लाखांपेक्षा जास्त डोस वितरित करण्यात आले असून आफ्रिकेतील २५ देशांमध्ये या लसीचा समावेश नियमित लसीकरण कार्यक्रमात करण्यात आला आहे.

मलेरियाचा विळखा अजूनही कायम

जागतिक स्तरावर मलेरियाच्या फैलावाची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. २०२४ मध्‍ये जगभरात सुमारे २८ कोटी २० लाख मलेरियाचे रुग्ण आढळले, तर ६ लाख १० हजार लोकांचा या आजाराने मृत्यू झाला.

आफ्रिकेत सर्वाधिक फटका

आफ्रिका खंडात जगातील ९५% रुग्ण आणि मृत्यू नोंदवले गेले. यातही ५ वर्षांखालील चिमुकल्यांचे प्रमाण तब्बल ७४% इतके मोठे होते.त्यामुळे केवळ लस उपलब्ध करून देणे पुरेसे नसून, अतिसंवेदनशील भागात राहणाऱ्या शेवटच्या घटकापर्यंत ती वेळेत पोहोचवणे हेच सर्वात मोठे आव्हान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT