Health Care Tips
पावसाळ्यात अन्नविषबाधा टाळण्यासाठी महत्त्वाचे उपाय File Photo
आरोग्य

Health Care Tips| पावसाळ्यात अन्नविषबाधा टाळण्यासाठी महत्त्वाचे उपाय

पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यात अनेक आजार बळावतात आणि डोके वर काढतात. त्यामुळे या काळात स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज भासते. स्वच्छतेव्यतिरिक्त या मोसमात आहाराकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. कारण, अगदी लहानशी चूक किंवा निष्काळजीपणामुळेही अन्नातून विषबाधा होऊ शकते.

पावसाळ्यात अन्नविषबाधेची जीवाणू आणि जंतूमुळे अधिक भेडसावते. त्यामुळे आहाराच्या काही सवयी बदलल्या किंवा योग्य त्या लावून घेतल्या, तर अन्नातून विषबाधेसारख्या त्रासापासून बचाव करता येतो. पावसाळ्यात ओलसरपणामुळे जीवाणूंचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो. घरातील स्वच्छता ही अन्नविषबाधेला अटकाव करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे.

अन्नातून विषबाधा होत असल्यास पाण्याचे भरपूर प्रमाणात सेवन केले पाहिजे. तसेच दह्याचे सेवन केले पाहिजे. यंदाच्या पावसाळ्यात अन्नातून विषबाधा होण्यापासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय करता येतील, पाहूया... हातांची स्वच्छता : पावसाळ्यात जागोजागी पाणी साठते, शिवाय पाण्यात मातीही मिसळली जाते.

थोडक्यात काय, तर प्रत्येकजण घाण पाण्याच्या संपर्कात येतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या जीवाणूंच्या संपर्कातही आपण येतो. या हवेत बाहेरून आल्यावर हात स्वच्छ केले पाहिजेत. त्यामुळे अन्न विषबाधा टाळता येते. त्यासाठी जेवणापूर्वी आणि जेवणानंतर हात स्वच्छ करण्यास विसरू नये. त्याशिवाय शौचालयातून आल्यावर तसेच घरातील पाळीव प्राण्याला हात लावल्यावर हात, पाय स्वच्छ धुवावेत.

शिळे अन्न खाणे टाळा :

पावसाळ्यात शिळे अन्न खाऊ नये शरीराला त्यामुळे खूप नुकसान होते. पावसाळ्याच्या काळात शिळ्या अन्नाला खूप लवकर बुरशी लागण्याची शक्यता असते. तसेच माश्या आणि डास हे जेवणाच्या आसपास फिरत असतात. जेवण शिल्लक राहिल्यास ते फ्रीजमध्ये ठेवावे. शक्यतो अन्न ताजे असताना किंवा लवकरात लवकर संपवावे.

भाज्या धुणे :

पावसाळ्यात मातीचे प्रमाण अधिक असल्याने भाज्या ओलसर असतात. स्वयंपाकाला वापरण्यापूर्वी भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. त्यामुळे त्यातील जीवाणू काढून टाकले जातात. पावसाळ्यात भाज्यांना कीडही लागते. त्यामुळे अन्नातून विषबाधेपासून वाचण्यासाठी भाज्या स्वच्छ धुणे हाच योग्य उपाय आहे.

पदार्थ पूर्ण शिजवा :

स्वयंपाकातील पदार्थ पूर्ण शिजवून घ्या, जेणेकरून त्यातील विषारी घटक जे शरीराला नुकसान पोहोचवतात ते बाहेर पडतात; अन्यथा अन्नातून विषबाधेची शक्यता वाढते.

मुदत संपलेले पदार्थ :

तयार खाद्यपदार्थ विकत घेताना त्यावरील मुदत जरूर पाहावी. मुदत उलटून गेल्यानंतरचे पदार्थ विकत घेऊ नयेत. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते.

प्रवासात नको बाहेरील पदार्थ :

प्रवास करताना भूक लागतेच, पण बाहेरील पदार्थ विकत घेणे शक्यतो टाळावे. निघताना घरातून गरम आणि ताजे शिजवलेले अन्न बरोबर ठेवावे. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे.

SCROLL FOR NEXT