आरोग्य

HEALTH WARNING : चहा-कॉफी खूप कडक पिण्याची सवय आहे? सावधान, कॅन्सरचा धोका तिप्पट! नवीन संशोधन काय सांगते?

अतिउष्ण पेयांचे सेवन आणि अन्ननलिकेचा कर्करोग यांच्यातील संबंधावर अभ्यासातून शिक्कामोर्तब

पुढारी वृत्तसेवा

Hot Tea Coffee Esophageal Cancer Risk : तुम्हाला सतत अतिशय उकळता चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल, तर नवीन संशोधातील माहिती जाणून घेणे ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जगात आतापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या संशोधनातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नियमितपणे कडक गरम पेये प्यायल्याने अन्ननलिकेचा (Oesophageal Cancer) कर्करोग होण्याचा धोका तब्बल तिप्पट वाढू शकतो.

मध्‍यमवयीन महिलांसह पुरुषांचा सलग १४ वर्षे अभ्‍यास

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला असून त्याचे निष्कर्ष 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर'मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ब्रिटनमधील सुमारे १० लाख मध्यमवयीन महिला आणि पुरुषांचा सलग १४ वर्षे अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

संशोधनात काय आढळलं?

  • ६५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान घातक: 'इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर'नुसार, ६५°C किंवा त्यापेक्षा जास्त तापमानाचे पेये "अतिउष्ण" (Very Hot) मानले जातात.

  • जे लोक कोमट पेयांपेक्षा अतिउष्ण पेये पितात, त्यांना अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका तिप्पट असतो.

  • दिवसातून ६ किंवा त्याहून अधिक वेळा अतिउष्ण पेये पिणाऱ्यांमध्ये हा धोका अधिक प्रमाणात दिसून आला.

  • चहा किंवा कॉफीमध्ये दूध मिसळले तरीही त्याचे तापमान तात्काळ कमी होत नाही. त्यामुळे पेय थोडे थंड होऊ देणे आवश्यक आहे.

तज्ज्ञ कोणती काळजी घेण्‍यास सांगतात ?

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या न्यूट्रिशनल एपिडेमिओलॉजिस्ट आणि या अभ्यासाच्या सह-लेखिका केरेन पापियर (Keren Papier) यांनी नवीन संशोधनावर म्‍हटलं आहे की, "सामान्यतः लोक ५० ते ६० अंश सेल्सिअस तापमानाला चहा-कॉफी पितात. परंतु, पेय पिताना जिभेला किंवा घशाला त्रास होत असेल, तर ते थोडे थंड होऊ देणे हाच उत्तम मार्ग आहे. पेय फार गरम नसून कोमट किंवा मध्यम गरम असतानाच प्यावे."

दुर्मिळ कर्करोगाचा धोका

संशोधकांनी स्पष्ट केले आहे की, अन्ननलिकेचा 'स्क्वॅमस सेल कार्सिनोमा' हा कर्करोग तसा दुर्मिळ आहे. ब्रिटनमध्ये आयुष्यभरात हा आजार होण्याचा धोका १% इतकाच आहे.अन्ननलिकेच्या कर्करोगासाठी धूम्रपान, मद्यपान आणि लठ्ठपणा हीच मुख्य जीवनशैलीविषयक कारणे आजही कायम आहेत. त्यामुळे चहा-कॉफी थोडी थंड करून पिण्यासोबतच धूम्रपान आणि मद्यपान टाळणे हे कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी सर्वाधिक गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT