हँगओव्हर होण्यामागे केवळ मद्यपानच कारणीभूत असते असे नाही तर शरीरात होणारे अनेक रासायनिक बदल कारणीभूत ठरतात.
Hangover Causes
'थर्टी फर्स्ट'च्या सेलिब्रेशनला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देतानाचे अनेकांनी प्लॅनिंगही केले असेल; पण दरवर्षी 'थर्टी फर्स्ट'बरोबरच ‘हँगओव्हर’ हाही शब्द सेलिब्रेशन करणाऱ्यांच्या काहींच्या तोंडी असतोच. जाणून घेऊया हँगओव्हरचा त्रास नेमका होतो तरी कसा याविषयी...
मद्यपान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाणवणारा त्रास, ज्याला आपण 'हँगओव्हर' म्हणतो. तो केवळ मद्यामुळेच होतो असे नाही. त्यामागे शरीरात होणारे अनेक रासायनिक बदल कारणीभूत असतात.
दारू शरीरात गेल्यानंतर ती विविध प्रकारे परिणाम करते. अल्कोहोल हे 'डाययुरेटिक' आहे. यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होते, परिणामी डोकेदुखी, चक्कर येणे, खूप तहान लागणे असे त्रास होतात.
अल्कोहोलमुळे पोटात ॲसिडचे प्रमाण वाढते. पचनमार्गात जळजळ होते. यामुळे मळमळणे, उलट्या होणे किंवा जुलाब होण्याचा त्रास होऊ शकतो. मद्यपानामुळे शरीरातील क्षारांचे प्रमाण बिघडते. थकवा, चिडचिड आणि अशक्तपणा जाणवतो. अल्कोहोलमुळे शरीरात ग्लुकोज तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. रक्तातील साखर कमी झाल्यामुळे (Hypoglycemia) चक्कर आणि थकवा येऊ शकतो. मद्यप्राशनानंतर लवकर झोप लागली तरी ती झोप गाढ नसते. मध्यरात्री वारंवार जाग येते, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सुस्ती जाणवते.
प्रत्येक व्यक्तीवर अल्कोहोलचा परिणाम वेगवेगळा असतो. काही घटक यासाठी कारणीभूत ठरतात. यामध्ये काही लोकांच्या जनुकीय रचनेमुळे त्यांना एका पेयानंतरही उलट्या किंवा अस्वस्थता जाणवू शकते. संशोधनानुसार, तरुण लोकांमध्ये हँगओव्हरची लक्षणे अधिक तीव्र असू शकतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हँगओव्हरचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. मद्यपानासोबत धूम्रपान करणे किंवा उशिरापर्यंत जागे राहिल्याने हँगओव्हरची तीव्रता वाढते.
साधारणपणे, हँगओव्हरची लक्षणे २४ तासांच्या आत आपोआप कमी होतात. मात्र, प्रत्येकाच्या बाबतीत हे प्रमाण वेगळे असू शकते. एका संशोधनानुसार, हँगओव्हरचे तीन प्रकार असतात. काही लोकांना सकाळी जास्त त्रास होतो, तर काही लोकांना दुपारच्या लक्षणे तीव्र जाणवतात आणि संध्याकाळपर्यंत ती कमी होतात. विशेषतः पोटाच्या तक्रारी असल्यास दुपारच्या वेळी त्रास जास्त वाढण्याची शक्यता असते.