डॉ. संजय गायकवाड
वय वाढत गेलं की अनेकांना स्मरणशक्ती कमी होणे, विचार करण्याची गती मंदावणे, विसरभोळेपणा किंवा डिमेन्शिया/अल्झायमर होण्याची भीती वाटते. ही चिंता अगदी नैसर्गिक आहे. खरे पाहता, शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी शारीरिक व्यायाम गरजेचा असतो, तसाच मेंदू तल्लख ठेवण्यासाठी बौद्धिक व्यायाम (ब्रेन एक्सरसाईझ) करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
नियमितपणे केलेल्या मेंदूच्या व्यायामामुळे स्मरणशक्ती सुधारते, एकाग्रता वाढते, समस्या सोडवण्याची क्षमता तीव्र होते आणि न्यूरोप्लॅस्टिसिटीची क्षमता अधिक प्रभावी बनते.
नवीन भाषा शिकणे : नवीन भाषा शिकताना मेंदूच्या विविध भागांवर ताण येतो. त्यामुळे स्मरणशक्ती, एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळण्याची क्षमता आणि मानसिक चपळता वाढते. संशोधनाने सिद्ध केलंय की, भाषा शिकणं हे डिमेन्शियाचा धोका कमी करते.
बुद्धिचातुर्याचे खेळ खेळणे : सुडोकू, शब्दकोडे, बुद्धिबळ (चेस) यांसारखे खेळ मेंदूला सतत कार्यरत ठेवतात. अशा खेळांत युक्तिवाद, स्मरणशक्ती, पॅटर्न ओळखण्याची क्षमता यांचा उपयोग होतो, जे मानसिक क्षमतांसाठी उपयुक्त ठरतात.
रोज वाचन व विचारमंथन : रोज काहीतरी वाचल्यास ज्ञान तर वाढतेच; पण त्यातून समज, शब्दसंपदा व एकाग्रता याही सुधारतात. वाचलेल्या गोष्टींबाबत विचार करणं, म्हणजेच विचारमंथन केल्यास स्मरणशक्ती बळकट होते.
वाद्य वाजवायला शिकणे : संगीत वाद्य शिकल्यास मेंदू आणि शरीर यामधील समन्वय वाढतो. श्रवणक्षमता, स्मरणशक्ती आणि बारीक हालचालींची समज वाढते. वाद्य शिकताना मेंदूचे अनेक भाग एकत्र सक्रिय होतात.
स्मरणशक्तीचा सराव : मेमरी गेम्स, अँप्स किंवा पुनरुच्चाराच्या तंत्रांचा वापर केल्यास लघुकालीन व दीर्घकालीन स्मरण सुधारते. या सरावामुळे एकाग्रता वाढते आणि आठवण ठेवण्याची पद्धत अधिक सक्षम होते.
ध्यानधारणा व मनःशांतीचा सराव : ध्यान म्हणजे पारंपरिक व्यायाम नसला, तरी यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, भावनिक स्थैर्य आणि तणाव नियोजन सुधारते. ध्यानामुळे मेंदूतील ग्रे मॅटर वाढते, जे मेंदूच्या प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असते.
गणित सोडवणे : बिलाची गणिते, छोटे गणिती प्रश्न कॅल्क्युलेटरशिवाय सोडवण्याचा सराव करा. यामुळे तार्किक विचार, गतिशील विचार आणि संख्यात्मक समज वाढते.
नवी कौशल्ये शिकणे : नेहमीच्या सवयींपासून बाहेर पडून एखादा नवीन रस्ता निवडणे, नवीन पदार्थ बनवणे किंवा हस्तकला शिकणे यामुळे मेंदूला नव्याने विचार करावा लागतो. त्यामुळे मेंदू ताजातवाना राहतो.
डायरी लिहिणे : आपले विचार लेखनात उतरवणं हे संवाद कौशल्य, स्मरणशक्ती आणि सर्जनशील विचारशक्ती वाढवतं. भावनिक आरोग्य चांगलं राहणं हेही मेंदूच्या कामगिरीसाठी महत्त्वाचं असतं.
इतरांशी संवाद साधणे : इतरांशी अर्थपूर्ण संवाद साधणे, चर्चा करणे किंवा गप्पा मारणे यामध्ये मेंदू एकाच वेळी अनेक गोष्टी करते. ऐकणे, समजून घेणे, उत्तर देणे, आठवण ठेवणे. म्हणूनच सामाजिकद़ृष्ट्या सक्रिय राहणं हे स्मरणशक्ती आणि समज वाढवण्यास फार महत्त्वाचं आहे.
वय वाढत असताना मेंदू तल्लख ठेवणं ही काळाची गरज आहे. यासाठी वरील बौद्धिक व्यायाम नियमित केल्यास विचारशक्ती, निर्णयक्षमता, स्मरणशक्ती आणि भावनिक समतोल दीर्घकाळ राखता येतो.