प्रातिनिधिक फोटो. AI-generated image
आरोग्य

Child Brain : पालकत्व किंवा IQ नव्‍हे, मुलांच्या मेंदूच्‍या विकासावर होतो 'या' गोष्टीचा मोठा परिणाम! नवीन रिसर्च काय सांगतो?

Child Brain Development : नवीन संशोधनात मुलांच्‍या मेंदूच्या विकासावरील सामाजिक-आर्थिक घटकांचा परिणामावर प्रकाशझोत

Namdev Gharal

आर्थिक परिस्थितीचा थेट परिणाम मुलांच्या मेंदूतील 'मोटर' (हालचालींवर नियंत्रण ठेवणारे) आणि 'सेन्सरी' (संवेदना किंवा भावना समजून घेणारे) भागांवर होतो.

Child Brain Development : मुलांच्या मेंदूच्या विकासात कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची ठरते, यावर आजवर अनेक संशोधने झाली आहेत. यापूर्वी मुलांच्या बुद्ध्यांकावर (IQ) आणि उत्कृष्ट पालकत्वावर (Parenting) याचा अधिक प्रभाव असल्याचे मानले जात होते. मात्र, आता एका नवीन अभ्यासातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

९ ते १० वयोगटातील सुमारे १२,००० मुलांचा सखोल अभ्‍यास

या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी ९ ते १० वयोगटातील सुमारे १२,००0 मुलांच्या राहणीमानाचा, आरोग्याचा आणि त्यांच्या रोजच्या सवयींचा सखोल अभ्यास केला. मुलांच्या मेंदूवर परिणाम करणाऱ्या तब्बल ६४९ वेगवेगळ्या गोष्टींची त्यांनी तपासणी केली. यामध्ये मुलांचा स्क्रीन टाइम (मोबाईल-टीव्ही पाहण्यात जाणारा वेळ), त्यांची विचार करण्याची क्षमता, शारीरिक-मानसिक आरोग्य, पालकांचे संगोपन आणि त्यांचे लिंग अशा अनेक घटकांचा समावेश होता.

मुलांच्या मेंदूच्या विकासात कुटुंबाच्या आर्थिक स्थिती अत्यंत महत्त्वाची

या नवीन संशोधनानुसार, मुलांच्या मेंदूच्या विकासात कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मुलाच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि परिसर (ज्या भागात ते वाढतात) यांचा त्यांच्या मेंदूच्या विकासावर पूर्वी वाटत होता त्यापेक्षा अधिक तीव्र परिणाम होऊ शकतो. मुलांच्या मेंदूच्या विकासावर त्यांच्या परिसराचा आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा सर्वात मोठा प्रभाव पडतो. आर्थिक परिस्थितीचा थेट परिणाम मुलांच्या मेंदूतील 'मोटर' (हालचालींवर नियंत्रण ठेवणारे) आणि 'सेन्सरी' (संवेदना किंवा भावना समजून घेणारे) भागांवर होतो. मेंदूचे हे भाग मुलांची झोप आणि रोजचा मानसिक तणाव या गोष्टींना खूप संवेदनशील असतात, म्हणजेच या बदलांचा त्यांच्यावर लगेच परिणाम होतो. बालपणात मुलाला येणाऱ्या प्रत्येक चांगल्या-वाईट अनुभवाची थेट छाप त्याच्या मेंदूवर उमटत असते. याचाच परिणाम त्याच्या उर्वरित आयुष्यातील निर्णयक्षमतेवर, विकासावर आणि कार्यक्षमतेवर होतो, असेही या संशोधनात प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे.

मुलांच्‍या मेंदूच्या विकासावर सामाजिक-आर्थिक घटकांचा परिणाम

अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, मुलांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेतील फरकांपैकी सुमारे १६% फरक हा सामाजिक-आर्थिक घटकांमुळे निर्माण होतो; हा प्रभाव बुद्ध्यांक (IQ), पालकत्वाची पद्धत आणि आरोग्याचा इतिहास यांच्या प्रभावापेक्षाही अधिक होता.

तब्बल ९० कोटी मुले करताहेत 'गरिबी'चा सामना : 'युनिसेफ'

गरिबीचा सर्वात मोठा आणि वाईट फटका लहान मुलांना बसतो. मोठ्या माणसांपेक्षा मुलांच्या वाट्याला गरिबी येण्याची शक्यता जास्त असते, ज्याचा त्यांच्या वाढत्या वयावर आणि भविष्यावर खूप गंभीर परिणाम होतो. 'युनिसेफ'च्या (UNICEF) एका अहवालानुसार, जगभरातील तब्बल ९० कोटी मुले सध्या 'बहुआयामी गरिबी'चा सामना करत आहेत. म्हणजेच, या कोट्यवधी मुलांना अन्न, शुद्ध पाणी, राहण्यासाठी घर, शिक्षण आणि आरोग्यासारख्या अगदी प्राथमिक आणि मूलभूत गरजांशिवाय जगावे लागत आहे.

मेंदूच्या स्कॅनवरून मुलाचा 'आयक्यू' (IQ - बुद्ध्यांक) निश्चित करता येत नाही

अभ्यासाचे मुख्य लेखक स्कॉट मारेक यांनी सांगितले की, " मुलांच्‍या मेंदूच्या विकासावर सामाजिक-आर्थिक संधींचा काहीतरी परिणाम होईल, पण तो इतका मोठा असेल असे वाटले नव्हते. या घटकाने इतर सर्व गोष्टींचे महत्त्व गौण ठरवले आहे. केवळ मुलांच्या मेंदूचे स्कॅन पाहूनच संशोधक त्या मुलाचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहे आणि त्याला किती झोप व 'स्क्रीन टाइम' (मोबाईल-टीव्ही पाहण्याचा वेळ) मिळतो, हे सांगू शकत होते. मात्र, मेंदूच्या स्कॅनवरून मुलाचा 'आयक्यू' (IQ - बुद्ध्यांक) निश्चित करता येत नाही. आयक्यू हा न्यूरोबायोलॉजीवर (मज्जासंस्थेच्या जीवशास्त्रीय रचनेवर) आधारित नसतो. मुलांच्या मेंदूची जडणघडण ज्या प्रकारे होते, त्याकडे अनेकदा आयक्यूचे निदर्शक म्हणून चुकीच्या दृष्टीने पाहिले जाते; परंतु प्रत्यक्षात ती केवळ तणाव आणि अपुऱ्या झोपेची लक्षणे असतात," असेही मारेक यांनी स्‍पष्‍ट केले.

याचा अर्थ "कमी हुशार मेंदू" आहे असा होत नाही...

"कमी सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या मुलाचा मेंदू हा उच्च सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या, परंतु पुरेशी झोप न मिळालेल्या आणि तणावाखाली असलेल्या मुलाच्या मेंदूसारखा दिसतो. याचा अर्थ "कमी हुशार मेंदू" आहे असा होत नाही; जर मर्यादित सामाजिक-आर्थिक संधी असलेल्या घरांमधील मुलांची झोप सुधारण्याचे आणि तणाव कमी करण्याचे उपाय केले गेले, तर या परिस्थितीशी संबंधित फरक कमी करता येऊ शकतात, असे या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक निको डोसेनबाख यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT