Social Media impact on children | समाजमाध्यमांच्या विळख्यातील बालपण

Social Media impact on children |
Social Media impact on children | समाजमाध्यमांच्या विळख्यातील बालपण
Published on
Updated on

कावेरी गिरी

जितका सोशल मीडिया, इंटरनेटचा वापर प्रभावी, सकारात्मक ठरला आहे, तितकेच त्याच्या अतिरिक्त वापरामुळे नुकसान देखील होताना दिसते. या बदलत्या स्थितीत कर्नाटक सरकारने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे, तर आंध्र प्रदेशात 13 वर्षांखालील मुलांसाठी अशीच मर्यादा लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

डिजिटल युगाने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडिया ही साधने आता केवळ प्रौढांपुरती मर्यादित राहिली नाहीत, तर लहान मुलांच्या जीवनाचाही अविभाज्य भाग बनली आहेत. जितका सोशल मीडिया, इंटरनेटचा वापर प्रभावी, सकारात्मक ठरला आहे. तितकेच त्याच्या अतिरिक्त वापरामुळे नुकसानदेखील होताना दिसते. या बदलत्या स्थितीत कर्नाटक सरकारने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे, तर आंध्र प्रदेशात 13 वर्षांखालील मुलांसाठी अशीच मर्यादा लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुलांचे मानसिक आरोग्य, शिकण्याची क्षमता आणि डिजिटल सवय पाहता कडक नियम करणे गरजेचे ठरले. या पार्श्वभूमीवर मुलांवर सोशल मीडियाचा होणारा परिणाम आणि त्यावर उपाययोजना यांचा सखोल विचार करणे अत्यंत गरजेचे ठरते.

आजची पिढी डिजिटल नेटिव्ह म्हणून ओळखली जाते. म्हणजेच, ही मुले जन्मापासूनच तंत्रज्ञानाच्या सानिध्यात वाढत आहेत. मोबाईल हाताळणे, अ‍ॅप्स वापरणे, व्हिडीओ पाहणे ही त्यांच्यासाठी सहज गोष्ट झाली आहे. सुरुवातीला हे सर्व निरुपद्रवी वाटते; परंतु हळूहळू ते सवयीचे रूप धारण करते आणि नंतर व्यसनात परिवर्तित होते. हीच स्थिती आज अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. सोशल मीडियाचा सर्वात मोठा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत आहे. 16 वर्षांखालील वय हा व्यक्तिमत्त्व घडण्याचा, आत्मविश्वास निर्माण होण्याचा आणि भावनिक स्थैर्य विकसित होण्याचा काळ असतो; मात्र सोशल मीडियामुळे मुलांची विचारप्रक्रिया कृत्रिम जगाशी जोडली जात आहे. ते स्वतःची तुलना सतत इतरांशी करतात. इतरांचे आकर्षक फोटो, महागड्या वस्तू, यशस्वी जीवन पाहून त्यांना स्वतःबद्दल असमाधान वाटू लागते. हा न्यूनगंड हळूहळू त्यांच्या मनावर ताण निर्माण करतो.

याचबरोबर लाईक्स आणि फॉलोअर्स या संकल्पना मुलांच्या मनात खोलवर रुजत आहेत. त्यांच्या पोस्टला किती प्रतिसाद मिळतो, यावर त्यांचा आनंद किंवा दुःख अवलंबून राहू लागते. एका इन्फ्ल्युएन्सर मुलीने फॉलोअर्स कमी झाल्याने आपले जीवन संपवले होते, ही गोष्ट विसरता येणार नाही. ही बाह्य मान्यतेवर आधारित मानसिकता अत्यंत धोकादायक आहे. कारण, यामुळे मुलांची स्वमूल्याची भावना (ीशश्रष ुेीींह) कमकुवत होते. ते स्वतःच्या क्षमतेपेक्षा इतरांच्या प्रतिक्रियांना जास्त महत्त्व देऊ लागतात. मानसिक आरोग्याच्या द़ृष्टीने पाहिले, तर सोशल मीडियाचा अतिरेक नैराश्य, चिंता, एकटेपणा आणि असुरक्षितता वाढवतो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, जास्त वेळ सोशल मीडियावर घालवणार्‍या मुलांमध्ये नैराश्याची लक्षणे अधिक दिसतात. त्यांना वास्तव जीवनात आनंद मिळण्याऐवजी आभासी जगातच समाधान मिळू लागते. परिणामी, त्यांचा वास्तवाशी संपर्क कमी होतो.

मुलांच्या वर्तनातही मोठे बदल दिसून येतात. ते चिडचिडे, उतावळे आणि कमी संयमी होत आहेत. मोबाईल काढून घेतल्यास रागावणे, आक्रमक वागणे ही लक्षणे आता सामान्य झाली आहेत. मोबाईल दाखवल्याशिवाय मुले सध्या जेवत नाहीत, ही ‘हर घर की कहाणी’ पाहायला मिळते. प्रत्यक्ष संवादाची सवय कमी होत चालली आहे. मित्रांसोबत खेळणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे याऐवजी ते स्क्रीनसमोर वेळ घालवणे पसंत करतात. यामुळे सामाजिक कौशल्यांचा विकास अडथळ्यात येतो. आरोग्याच्या द़ृष्टीने मोबाईल आणि सोशल मीडियाचा परिणाम अत्यंत गंभीर आहे. सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. डिजिटल आय स्ट्रेन ही समस्या वाढत आहे. डोळे कोरडे पडणे, डोकेदुखी, द़ृष्टी कमी होणे या समस्या लहान वयातच दिसू लागल्या आहेत. त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरण्याची सवय झोपेच्या पद्धतीवर परिणाम करते. अपुरी झोप ही मेंदूच्या विकासासाठी घातक ठरते. शारीरिक हालचालींचा अभाव हा आणखी एक मोठा धोका आहे. बाहेर खेळण्याऐवजी मुले मोबाईलवर गेम्स खेळण्यात किंवा व्हिडीओ पाहण्यात वेळ घालवतात. यामुळे लठ्ठपणा, शारीरिक तंदुरुस्ती कमी होणे आणि प्रतिकारशक्ती कमी होणे या समस्या वाढतात. बालपणातील सक्रिय जीवनशैली कमी होत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे.

सोशल मीडियावर उपलब्ध असलेला अयोग्य कंटेंट हा मुलांसाठी गंभीर धोका आहे. हिंसक व्हिडीओ, अश्लील सामग्री, चुकीची माहिती आणि अफवा यांचा त्यांच्या मनावर नकारात्मक प्रभाव पडतो. लहान वयातच चुकीच्या गोष्टींचा प्रभाव त्यांच्या वर्तनात दिसू लागतो. सायबरबुलिंग ही समस्या तर दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाईन छळ, टोमणे, अपमान यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य गंभीरपणे बिघडू शकते. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारकडून सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय हा मुलांच्या संरक्षणाच्या द़ृष्टीने महत्त्वाचा आहे; मात्र केवळ बंदी हा अंतिम उपाय नाही. कारण, तंत्रज्ञान पूर्णपणे टाळणे शक्य नाही. त्यामुळे योग्य वापर आणि मर्यादा यावर भर देणे अधिक आवश्यक आहे. मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी सर्वप्रथम पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पालकांनी स्वतः मोबाईलचा वापर नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. कारण, मुले पाहून शिकतात. घरातील मोठी मंडळी सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असतील, तर मुलांकडून वेगळ्या वर्तनाची अपेक्षा ठेवणे योग्य नाही. घरात नो मोबाईल झोन किंवा स्क्रीन फ्री टाईम निश्चित करणे उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, जेवणाच्या वेळी, अभ्यासाच्या वेळेत किंवा झोपण्यापूर्वी मोबाईल वापरण्यास बंदी घालणे. यामुळे मुलांची सवय हळूहळू बदलू शकते.

मुलांना पर्यायी उपक्रमांकडे वळवणे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. क्रीडा, वाचन, कला, संगीत, निसर्गभ्रमण अशा उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो, तसेच त्यांचे लक्ष मोबाईलपासून दूर जाते. संवाद हा या समस्येचा कळीचा मुद्दा आहे. मुलांशी मोकळेपणाने बोलणे, त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे समजावून सांगितल्यास ते अधिक जबाबदारीने तंत्रज्ञान वापरतात. शाळा आणि शैक्षणिक संस्था यांनीही या विषयात सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षा आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर याबाबत मुलांना शिक्षण देणे आवश्यक आहे. यामुळे ते सजग नागरिक बनतील.

एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मुलांना पूर्णपणे बंदी घालण्याऐवजी त्यांना संतुलित वापर शिकवणे अधिक उपयुक्त ठरते. कारण, भविष्यात तंत्रज्ञानाशिवाय जीवनाची कल्पना करता येणार नाही. त्यामुळे त्याचा योग्य वापर करण्याची सवय लहानपणापासूनच लागणे गरजेचे आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील निर्णय हे समाजासाठी एक इशारा आहेत. या निर्णयांकडे केवळ राजकीय किंवा प्रशासकीय पातळीवर न पाहता सामाजिक जबाबदारी म्हणून पाहणे आवश्यक आहे. मुलांचे बालपण सुरक्षित, निरोगी आणि आनंदी ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शेवटी, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे-मुलांना तंत्रज्ञानापासून पूर्णपणे दूर ठेवणे हा उपाय नाही; पण त्याच्या अतिरेकापासून त्यांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शन, प्रेमळ संवाद आणि सकारात्मक वातावरण यांच्या साहाय्याने आपण पुढील पिढीला अधिक सक्षम, आत्मविश्वासी आणि निरोगी बनवू शकतो. हीच या निर्णयामागील खरी भावना आहे आणि ती प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news