Latest

Avoid Heart Attack : हृदयविकाराचा झटका टाळण्‍यासाठी दररोज कितीवेळ व्‍यायाम करावा?

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: ऑक्टोबर हा सडन कार्डियक अरेस्ट (एससीए) (Avoid Heart Attack) जागरूकता महिना आहे. देशात तरुणांत हृदयविकाराच्या घटनांत वाढ होत असल्याचे चित्र आहे. अचानक येणारा हृदयविकाराचा झटका हा टाळता येण्यासारखा असतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. दररोज योग्य प्रमाणात व्यायाम, चांगला आहार यामुळे अचानक येणारा हृदयविकाराचा झटका टाळता येतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

दरवर्षी अचानक हृदयविकाराचा झटका Avoid Heart Attack) आल्‍याने मृत्यू होण्‍याची ७ लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली जातात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्‍या (डब्‍ल्‍यूएचओ)  मते सीव्‍हीडीमुळे होणारे ८६ टक्‍के मृत्‍यू प्रतिबंध आणि उपचारांद्वारे टाळता येऊ शकतात. कार्डियोव्‍हॅस्‍कुलर (हृदय व रक्‍तवाहिन्‍यासंबंधित) आरोग्यावर परिणाम करणारा सर्वांत मोठा घटक म्हणजे जीवनशैली होय.

बॉम्‍बे हॉस्पिटल ॲण्‍ड मेडिकल रिसर्च सेंटरचे कार्डियोलॉजिस्‍ट डॉ. नागेश वाघमारे म्‍हणाले, "धूम्रपानसारखी अनारोग्‍यकारक जीवनशैली, शारीरिक व्‍यायामाचा अभाव, उच्‍च रक्‍तदाब व कोलेस्‍ट्रॉल, लठ्ठपणा आणि मादक पदार्थांने व्‍यसन हे जोखीम घटक असू शकतात. यासह वय (पुरुषांसाठी ४५ वर्ष आणि महिलांसाठी ५५ वर्षांपेक्षा जास्त आणि हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास किंवा पूर्वीच्या हृदयविकाराचा इतिहास देखील संभाव्य कारणे असू शकतात.''

दररोज ३० ते ४० मिनिटे व्‍यायाम आवश्‍यक

"दररोज ३० ते ४० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. व्‍यक्‍तीने दररोज वेगाने चालले पाहिजे. तसेच सायकलिंग, पोहणे व आवडीनुसार जॉगिंग सारखे व्‍यायाम केले पाहिजेत. चालणे, पोहणे, सायकलिंग आणि जॉगिंग असे व्‍यायाम हृदयासाठी अत्यंत आरोग्यदायी ठरतात. यासह, योग्य पोषण व दररोज ७ ते ८ तास झोप घेणे आवश्यक आहे. याशिवाय ताणतणाव टाळणे (Avoid heart attack) आवश्यक असते.", असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

सडन कार्डियक अरेस्‍ट हा हार्टॲटॅकपेक्षा वेगळा आहे. हार्ट  ॲटॅक हृदयाच्या धमन्या ब्लॉक झाल्यामुळे होतो. तर कार्डियक अरेस्‍ट सामान्यतः हृदयाच्या असामान्य लयीमुळे होतो. हृदयाची इलेक्ट्रिकल सिस्टिम योग्यरित्या कार्य करत नसल्यास सडन कार्डियक अरेस्ट होतो. पाश्चिमात्य देशांतील व्‍यक्‍तींना त्यांच्या वयाच्‍या ६०व्‍या वर्षी हृदयविकाराचा झटका येतो, तर भारतातील व्‍यक्‍तींना वयाच्‍या ५०व्‍या वर्षी हृदयविकाराचा झटका येण्‍याचे निदर्शनास आले आहे. हृदयविकाराचा झटका कसा ओळखावा, त्याला प्रतिसाद कसा द्यावा आणि त्यावर उपचार कसे करावे हे जाणून घेतल्याने एखाद्याचे प्राण वाचू शकतात.

फोर्टिस हेल्‍थ केअरचे इंटरवेन्‍शनल कार्डियोलॉजी डॉ. विवेक महाजन म्‍हणाले, ''सामान्य हृदय गती पुनर्संचयित करण्यासाठी संभाव्य घातक कार्डियक ॲरिथमिया दरम्यान विद्युत शॉक देण्यासाठी इम्प्लांटेबल कार्डियोव्हर्टर-डिफिब्रिलेटर (आयसीडी) उपकरण वापरले जाऊ शकते. हे एक लहान, बॅटरीवर चालणारे उपकरण आहे, जे रुग्णांच्या हृदयाचे ठोके ट्रॅक करण्यासाठी आणि अनियमितता ओळखण्यासाठी छातीवर वापरले जाते. यासह ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्‍यक्‍तींनी रक्तदाब, कोलेस्टेरॉल, रक्‍त शर्करा (ब्‍लड शुगर) आणि ईसीजी यांचा तपासणी नियमित करणे आवश्यक आहे. अशा व्‍यक्‍तींना काही कोमोर्बिडीटीज असतील तर त्यांनी नित्‍यक्रम ठरवण्‍यापूर्वी सर्व तपासण्या करणे आवश्यक आहे., असेही त्‍यांनी नमूद केले.

कार्डियक अरेस्‍टनंतर देखील त्‍वरित व योग्‍य वैद्यकीय केअरसह वाचणे शक्‍य आहे. कार्डियोपल्‍मरी रिसुसिटेशन (सीपीआर), हृदयाला झटका देण्‍यासाठी डिफिब्रिलेटरचा वापर किंवा अगदी छातीवर दाब दिल्‍याने देखील वैद्यकीय मदत येईपर्यंत रूग्‍ण वाचण्‍याची शक्यता सुधारू शकते, असेही ते म्‍हणाले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT