पुणे ; पुढारी वृत्तसेवा
पुण्यात बिबवेवाडीत सुखसागर नगर भाग-2 मध्ये चालू असलेल्या बांधकामाचा कचरा शेजारच्या घरावर पडल्याने झालेल्या भांडणात इंजिनिअरने रागाच्या भरात एकाच्या छातीत चाकू भोसकून खून केला. ही धक्कदायक घटना आज (सोमवार) ) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
शरद सीताराम पुरी (वय 35, रा.सुख सागर नगर भाग 2 लेन नंबर 5 बिबेवाडी पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी सचिन विठ्ठल कपटकर (वय 46, रा. घर नंबर 246, सुखसागर नगर भाग 2, लेन नंबर 5 बिबवेवाडी पुणे) याला अटक केली आहे.
बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांनी सांगितले, बिबवेवाडीत सुखसागर नगर भाग-2 मध्ये पुरी आणि कपटकर शेजारी शेजारी राहण्यास आहेत. गुन्ह्यात मृत झालेले पुरी हे व्यावसायिक असून कपटकर हा इलेट्रिकल इंजिनिअर आहे. सध्या त्याला कोणताही कामधंदा नव्हता त्याच्या घरा शेजारीच पुरी यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्या बांधकामाचा कचरा कपटकर याच्या घरावर पडत होता.
कपटकर यांच्या घरावर कचरा पडल्याने झालेल्या भांडणात पुरी यांच्या छातीत कपटकर याने चाकू भोकसला यातच पुरी यांचा मृत्यू झाला.
तसेच इंदिरानगर चौकातील आम्रपाली पेट्रोल पंपाजवळील राजीव गांधी शॉपिंग सेंटरच्या पाठीमागील पार्किंगमध्ये एक बेवारस मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाईसाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.