लसीकरण केंद्रासाठी निश्चित अशी वेळ मर्यादा नाही! | पुढारी

लसीकरण केंद्रासाठी निश्चित अशी वेळ मर्यादा नाही!

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा

देशातील कोरोना लसीकरण केंद्रांसाठी निश्चित अशी वेळमर्यादा नाही. केंद्रांवर मुबलक प्रमाणात कर्मचारी तसेच सुविधा उपलब्ध असतील, तर रात्री १० वाजतापर्यंत देखील लस केंद्र सुरू ठेवता येईल, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. लसीकरण केंद्रांवर मुबलक कर्मचारी तसेच रात्री उशिरापर्यंत लसीकरण सुरू ठेवण्यासंबंधीची व्यवस्था असल्यास केंद्र सुरू ठेवण्यास कुठलीही हरकत नसल्याचे पत्र आज (सोमवार) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अपर सचिव डॉ.मनोहर अगनानी यांनी राज्यांना पाठवले.

सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू ठेवता येईल का? असा सवाल काही राज्यांनी केंद्रासमक्ष उपस्थित केला होता. लसीकरण केंद्रांसबंधी वेळमर्यादा निश्चित नाही. यासंबंधीचा निर्णय राज्य सरकारांना घ्यायचा आहे, असे केंद्राने पत्रातून स्पष्ट केले आहे.

कोरोना महारोगराईची तिसरी लाट वेगाने आक्रमक रूपाने वाढत आहे. प्रौढ, मुले तसेच खबरदारी म्हणून लसीकरणाचा बुस्टर डोसचे लक्ष पुर्ण करण्यासाठी लसीकरणावर बळ देण्याची आवश्यकतेवर केंद्र सरकारने भर दिला आहे. राज्यांना केंद्राकडून पुर्णत: सहकार्य केले जाईल, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले.

Back to top button