बारामती : पुढारी वृत्तसेवा : इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचे (ज्येष्ठ नेते शरद पवार) ऐकत आलात. आता माझे ऐका, आगामी लोकसभा निवडणूकीत उमेदवार कोणीही असू द्या, मीच उमेदवार आहे असे समजून माझ्या विचारांचा खासदार निवडून द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता टीका करत त्यांनी बारामतीतून आगामी निवडणूकीचे रणसिंग फुंकले. बारामतीत राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालय उदघाटन प्रसंगी पवार यांनी हे आवाहन केले. ते म्हणाले, गंभीर समस्येतून आपण जात आहोत. एकीकडे अजित सांगतो अस करा दुसरीकडे वरिष्ठ सांगता तसं करा, कुणाचं ऐकायच, माझी एवढीच विनंती आहे, एवढे दिवस वरिष्ठांचे ऐकले आता माझं ऐका असे पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी बोलून मी मतदारसंघासाठी भरीव निधी आणू शकेल. आजवर मी राज्य सरकारकडून कामे करून घेत होतो. केंद्रातूनही बारामतीसह मतदारसंघातील अन्य तालुक्यांसाठी मी निधी आणत विकास करणार आहे. आतापर्यंत असे किती आमदार – खासदार येऊन गेले, आपल्या आजूबाजूला देखील किती आमदार आणि खासदार होऊन गेले. पण आपल्या अडचणींना कोण आपल्याला उपयोगी पडतय याचाही विचार आपण करा असे पवार म्हणाले.
मी उमेदवार समजून मतदान करा
मला काही काही. लोकांची गंमत वाटते, काहीना उपाध्यक्ष मी केले, अध्यक्ष मी केले, करोडो रुपयांची जागा नाममात्र दराने घेऊन दिली. कधीही कुठली अडचण येऊ दिली नाही, मात्र काय झाला माहीत नाही. त्यांचं जोरात काम चालल आहे. काही जण मला मुंबईत भेटले, आमची चूक झाली, दादा, तुमच्याशिवाय कुणी काम करू शकत नाही असे म्हणाले. काहींची तर अडचण मला समजू शकते असेही ते म्हणाले.
शेवटची निवडणूक म्हणून भावनिक करतील
काहीजण यंदाच्या निवडणूकीत माझी ही शेवटची निवडणूक आहे, असे सांगत तुम्हाला भावनिक करतील. ते नुसतेच माझी शेवटची निवडणूक म्हणतात, पण शेवटची निवडणूक केव्हा होईल हेच समजत नाही, असा टोला त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला. कोणी कितीही भावनिक करायचा प्रयत्न केला तरी भावनिक होवू नका, असे अजित पवार म्हणाले.
सुप्रिया सुळे यांना टोला
आपल्या विचारांचा खासदार असेल तर कामे झपाट्याने होतील. विकासकामे करणारा खासदार आपल्याला हवा आहे, फक्त इकडे तिकडे फिरणारा नको, या शब्दात अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टोला लगावला.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.