नाशिक : पौषवारीसाठी त्र्यंबक वेशीवर विसावल्या दिंड्या | पुढारी

नाशिक : पौषवारीसाठी त्र्यंबक वेशीवर विसावल्या दिंड्या

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेला पौषवारी यात्रोत्सवानिमित्त राज्यातून ठिकठिकाणांहून आलेल्या दिंड्या त्र्यंबक परिसरात विसावल्याने त्र्यंबकनगरी गजबजली आहे. हजारो वारकरी कीर्तनात दंग असून चहुकडे कीर्तनाच्या मधूर गजरात त्र्यंबकनगरी तल्लीन झाली आहे.

पौषवारी दि. 4 ते 8 फेब्रुवारीदरम्यान होत आहे. लाखोंच्या संख्येने पायी दिंडीने निघालेले वारकरी 30 किलोमीटर परिसरात विसावले आहेत. दिंड्या रविवार (दि. 4) सकाळपासून दाखल होण्यास सुरुवात होईल. मानाच्या व परंपरेने येणाऱ्या दिंड्या सोमवारी (दि. 5) दशमीला नगरात प्रवेश करतील. दिंड्यांच्या मुक्कामी आलेल्या वारकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. वाहनाने पुढे आलेले वारकरी जागा साफसफाई करणे, मंडप उभारणे, स्वयंपाकासाठी पाण्याची व्यवस्था आदी तयारीत गुंतले आहेत.

यात्रेनिमित्त स्वेटर, ब्लँकेट, धार्मिक पुस्तके, कुंकू, प्रसाद विक्रेत्यांचेही आगमन झाले आहे. ते जागा मिळवण्यासाठी धावपळ करत आहेत. त्र्यंबकेश्वरच्या यात्रेत पाळणेवाले आणि लोकनाट्य, तमाशे, मनोरंजन करणारे यांचादेखील लक्षणीय सहभाग असतो. त्यांना जागा मिळवणे मागच्या काही वर्षांपासून दुरापस्त होत आहे. मात्र लोकाश्रयाच्या बळावर लोकनाट्य तमाशा फड येतात आणि यात्रेकरूंचे मनोरंजन करतात. त्यांचीदेखील तयारी सुरू झाली आहे.

रांगा pudhari.news
त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबलचक रांगा

यात्रेला जागाच शिल्लक नाही
त्र्यंबकेश्वरची पौषवारी पंढरपूर आळंदीप्रमाणे महत्त्वाची आहे. या यात्रेची नाळ संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाशी जोडलेली आहे. या यात्रेसाठी दिवसोंदिवस जागा कमी होत असल्याने आता यात्रेचे स्वरूप बदलत आहे. एकादशीच्या दुपारी फराळ आटोपल्यावर बैठका होत असतात. अशा या जत्रेला आता त्र्यंबकनगरीत जागा शिल्लक राहिली नसल्याचे चित्र आहे.

Back to top button