पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाने शनिवारी (८ ऑक्टो) ठाकरे, शिंदे या दोन्ही गटाला मोठा धक्का देत धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्यात आले आहे. त्याचबरोबर शिवसेना हे नाव देखील वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. आता यापुढे हे दोन्ही गट कोणते चिन्ह वापरणार असा प्रश्न सध्या उभा राहीला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे-सेनेचे (Eknath shinde) तलवार चिन्ह असणार का? ही संभावना निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेतील बंडखोरीनंतर आयोगाने शनिवारी दिलेला निर्णय हा दोन्ही गटांसाठी धक्कादायक ठरला आहे. हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपातील असल्याचे देखील आयोगाने सांगितले आहे. आयोगाच्या निकालानंतर आता शिवसेना म्हणून उभ्या राहिलेल्या दोन्ही गटांचे चिन्ह काय असेल यावरून जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक तर्क वितर्क सध्या लावले जात आहेत. शिंदे सरकार (Eknath shinde) आता या निर्णयानंतर तलवार हे चिन्ह घेणार अशी चर्चा सध्या रंगली आहे. तलवार हे एक चिन्ह सोडून आणखी काही चिन्हांची देखील चर्चा आहे. यामध्ये ढाल-तलवार, गदा यांचा समावेश आहे.
एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हात मिळवणी करून सत्तेत येऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी थेट शिवसेना पक्षाच्या चिन्हावर देखील दावा ठेवला होता. हे चिन्ह कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. पण आता हा पेचप्रसंग सुटला आहे. निवडणूक आयोग निर्णयाने नवे चिन्ह निवडण्याचे आदेश दोन्ही गटांना दिले आहेत.
शिंदे गटाचा दसरा मेळावा नुकताच बीकेसी मैदानावर पार पडला. या मेळाव्यात त्यांनी ५१ फुटी तलवारीचे पूजन केले होते. याच तलवार पूजनानंतर शिंदे गटाचे तलवार हे चिन्ह असणार का? याची चर्चा सुरू झाली. बीकेसी मैदानात झालेल्या मेळाव्याला झालेली शिवसैनिकांची गर्दी यावरून याआधी राजकारण तापलेले होते. निवडणूक आयोगाने गुरूवारी दिलेल्या निर्णयानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधान आलेले आहे. त्यामुळे आता कोणाचे चिन्ह काय असणार हे लवकरच समोर येईल.
हेही वाचा