

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (दि. ८) आसाममधील भाजपच्या नव्या कार्यालयाचे उद्धाटन केले. आसाममध्ये भाजप सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याचा दावा अमित शहा यांनी यावेळी बोलताना केला. गेल्या ७० वर्षांत पूर्वेकडील भारतात काँग्रेस पक्षामुळे अराजकता माजली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने पूर्व भारतात सुशासन प्रस्थापित केले आहे, असे शहा यावेळी म्हणाले. (Amit Shah In Assam)
कार्यालयाच्या उद्धाटनप्रसंगी बोलताना अमित शहांनी चार दशकांपूर्वीचा किस्साही सांगितला. शहा म्हणाले की, मी विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमासाठी आलो होतो, तेव्हा आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री हितेश्वर सौकिया यांनी मला मारहाण केली होती. आम्ही इंदिरा गांधी यांच्याविरोधात घोषणा देत होतो. त्यामुळे आम्हाला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यावेळी आम्हाला कल्पना नव्हती की, आम्ही स्वबळावर आसाममध्ये दोन वेळेस सरकार स्थापन करू. (Amit Shah In Assam)
पुढे बोलताना शहा म्हणाले की, भाजप सरकारने ९,००० लोकांना शस्त्र टाकण्यास भाग पाडत आसाममध्ये शांतता प्रस्थापित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पूर्वेकडील भागाचे आर्थिक बजेट तीनपट केले आहे. त्यामुळे या भागातील सर्वच क्षेत्रात विकास झाला आहे. कार्यालयाचे उद्धाटन करताना अमित शहा म्हणाले की, भाजप कार्यालय हे वीटा आणि सिमेंटनी बनलेली इमारत नाही, तर ते भाजपच्या कार्यकर्त्यांचे योगदान आणि भावना दर्शवते. या कार्यक्रमासाठी भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा उपस्थित होते. (Amit Shah In Assam)