नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागात मंगळवारी ( दि. ३) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. या भूकंपाचा परिणाम भारत, नेपाळ आणि चीनमध्ये दिसून आला. 30 मिनिटांच्या आत दोन भूकंप झाले, पहिला हादरा 2.25 वाजता आला, ज्याची तीव्रता 4.6 मोजली गेली, तर दुसरा हादरा 2.51 इतका जाणवला, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजली गेली. या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नसले तरी भूकंपानंतर नेपाळमधील बझांगमधील काही इमारतींचे नुकसान झाले असून काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील कांडा येथे होता. त्याची खोली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किमी होती. दिल्ली, बरेली, लखनौ, उत्तराखंड, नोएडा, फरिदाबाद, गुरुग्राम, गाझियाबादसह आसपासच्या शहरांमध्ये हे धक्के जाणवले. यासोबतच उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थानमध्येही लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
भूकंपाच्या वेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हेही निर्माण भवन येथील त्यांच्या कार्यालयातून बाहेर आले. यावेळी ते अधिकाऱ्यांशी बोलताना दिसले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर सांगितले की, दिल्लीतही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. मला आशा आहे की तुम्ही सर्व सुरक्षित असाल. तर दिल्ली पोलिसांनीही लोकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा