‘इसिस’च्या दहशतवाद्यासह तिघांना दिल्लीत अटक | पुढारी

‘इसिस’च्या दहशतवाद्यासह तिघांना दिल्लीत अटक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली पोलिसांनी ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवादी शाहनवाज ऊर्फ शफी उज्जामा याला अटक केली आहे. त्याच्यासमवेत अन्य दोन दहशतवाद्यांनाही पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिसांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शाहनवाज हा ‘इसिस मॉड्यूल’ म्हणजेच इस्लामिक स्टेटशी निगडित असल्याचा संशय आहे. उत्तर भारतात दहशतवादी हल्ले घडवण्याचे कारस्थान तो रचत होता. तो पुणे पोलिसांच्या ताब्यातून निसटून पळाला होता व त्याच्यावर ‘एनआयए’ने तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

‘एनआयए’ने ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांच्या यादीत शाहनवाजला समाविष्ट केले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने साऊथ-ईस्ट दिल्लीतून रविवारी रात्री त्याला अटक केली. त्याच्याजवळ काही रसायने आणि ‘आयईडी’ बनवण्याची सामग्री मिळाली.

सध्या त्याची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी सांगितले की, शाहनवाज व्यवसायाने इंजिनिअर आहे. तो दिल्लीचाच रहिवासी आहे. पण ‘पुणे इसिस केस’ मध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी त्याला अटक केली होती. पुण्यातून फरारी होऊन तो दिल्लीत लपून राहात होता. तेथूनच तो परदेशातील व्यक्तींपासून निर्देश घेत होता आणि उत्तर भारतात दहशतवादी हल्ले करण्याची कारस्थाने करीत होता. गेल्या महिन्यात ‘एनआयए’ने ‘पुणे इसिस मॉड्यूल केस’साठी शाहनवाजसह चार संशयित दहशतवाद्यांचे पोस्टर जारी केले होते. पुणे इसिस मॉड्यूल केस

याचवर्षी 18 जुलैला पुण्यात दुचाकी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कोथरुड पोलिसांनी शाहनवाज आणि मध्य प्रदेशातील मोहम्मद इम्रान खान व मोहम्मद साकी या दोघांना अटक केली होती. ज्यावेळी पोलिस त्यांना चौकशीसाठी त्यांच्या कोंढवा येथील राहण्याच्या ठिकाणावर नेत होते, त्यावेळी शाहनवाज पोलिस गाडीतून उडी मारून पळून गेला होता. मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद साकी यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांना आढळले की हे दोघे सुफा टेररिस्ट गँगचे आहेत. एप्रिल 2022 मध्ये राजस्थानात एका मोटारीत स्फोटके मिळाल्यानंतर तेथील पोलिसही त्यांना शोधत होती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाला ‘पुणे इसिस मॉड्यूल केस’ असे नाव दिले. या केसमध्ये पोलिसांनी आणखी तीन दहशतवाद्यांची नावे ‘मोस्ट वाँटेड’ यादीत समाविष्ट केली होती. त्यामध्ये पुण्याचा तल्हा लियाकत खान तसेच दिल्लीचे रिजवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुल्ला फैयाज शेख यांचा समावेश आहे.

Back to top button