पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह काही आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी पुण्यात भेट घेतल्याची चर्चा आहे. याबाबत अधिकृतरीत्या तपशील समजू शकलेला नाही. यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जयंत पाटील यांंनी मी अमित शहा यांना भेटलेलो नाही, असे स्पष्ट करत माझ्याबद्दल गैरसमज पसरविण्याचे उद्योग सुरू असल्याचा खुलासा केला. मी कुठेही जाणार नाही. शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सकाळपासून या बातम्यांमुळे माझी करमणूक झाली. काल संध्याकाळी मी शरद पवार यांच्या घरी होतोे. रात्री दीड वाजेपर्यंत आमदार अनिल देशमुख, राजेश टोपे तसेच सुनील भुसारांसह आम्ही एकत्र होतो. मग मी शहा यांना भेटण्यासाठी पुण्याला कधी गेलो, त्यांना कधी भेटलो याचे संशोधन झाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. एखाद्याबद्दल गैरसमज पसरविण्याचा उद्योग योग्य नाही. काय झाले, काय नाही याचा अभ्यास बातम्या देणार्यांनी केला पाहिजे, असे पाटील म्हणाले.
पुणे दौर्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री शहा शनिवारी रात्री शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी होते. त्याच हॉटेलमध्ये जयंत पाटील यांच्यासह आमदार सुमन पाटील, प्राजक्त तनपुरे यांनी शहा यांची भेट घेतल्याची चर्चा रविवारी सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीतून ही भेट झाली असून या भेटीच्या वेळी अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत कोणाकडूनही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, वृत्तवाहिन्यांमधून यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण केले.
अमित शहा आणि जयंत पाटील यांच्यात कोणतीही भेट झालेली नाही. त्यांच्या भेटीचे वृत्त निराधार आहे. असे वृत्त देण्यापूर्वी खातरजमा केली पाहिजे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचे वृत्त फेटाळून लावले.
हेही वाचा