Latest

Pistol license : पिस्तुल परवाना मिळवण्यासाठी केला जीवघेणा हल्ल्याचा बेबनाव?

backup backup

राजगुरूनगर :पुढारी वृत्तसेवा : Pistol license : पिस्तुल बाळगण्याची पोलिसांकडून रीतसर परवाना मिळावा यासाठी आधार म्हणून थेट जीवघेणा हल्ला झाल्याचा बेबनाव खेड तालुक्यातील एका नवनिर्वाचित सरपंचाने केल्याच्या प्रकाराची चर्चा संबंधित गावासह तालुक्यात आहे. खेड पोलीस ठाण्यात काही पोलीस या प्रकरणी दुजोरा देत आहेत.

मात्र या सरपंचाला सहकार्य करावे असा शेजारच्या मोठ्या नेत्यांचा सांगावा असल्याने पोलीसांनी या प्रकरणाची अडीच महिने चौकशी करून देखील काहीच हाती लागले नसताना कोणत्याही प्रकारची जाहीर वाच्चता केलेली नाही.

Pistol license : मागच्या काही दिवसांपुर्वी केली होती तक्रार

खेड तालुक्यातील एका गावच्या सरपंचावर मागील सप्टेंबर महिन्यात रात्री आडबाजूला रस्त्यावर खुनी हल्ला झाला. खेड पोलिसांत तक्रार दाखल आहे. सरपंच व त्यांचे एक सहकारी रात्री दहा वाजता अरुंद रस्त्यावरून त्यांच्या चारचाकी गाडीने घरी येत होते. अचानक समोरून दोन दुचाकी आल्या. त्या आडव्या लावून तोंड बांधलेले अज्ञात चार जण जवळ आले. त्यांनी दगडाने काच फोडून पिस्तुल रोखले. (Pistol license)

मात्र चारचाकी वेगात पळवून सरपंचाने सुटका करून घेतली. असे तक्रारीत म्हटले होते. या प्रकारात कोणाला साधे खरचटले सुद्धा नाही. दोन दुचाकी आडव्या लावल्यावर अरुंद रस्त्यावर चारचाकी जोरात सुरू करून पुढे कशी नेली? शिवाय हल्लेखोर फक्त काच फोडून शांत कसे राहिले की त्यांना फक्त तेवढेच करायचे होते ? असे विविध प्रश्न घटनेनंतर लोकांनी उपस्थित केले होते.

रात्री दहा वाजता घटना घडली मात्र लोकवस्ती असलेल्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी ही वाहने पाहिली नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले. गेले अडीच महिने तपास केला मात्र पोलिसांना आक्षेपार्ह काहीच मिळून आलेले नाही. त्याबाबत पोलीस काही सांगतही नाहीत. संभ्रम निर्माण करणाऱ्या या घटनेची त्यामुळे तालुक्यात उलट सुलट पण खमंग चर्चा सुरू आहे. पोलिस लाभार्थी तर झाले नाहीत ना? असेही म्हटले जाते आहे.

आपल्या जीवाला धोका संभवतो हे दाखवण्यासाठी सरपंचाने हा बनाव केला

मुळात आपल्या जीवाला धोका संभवतो हे दाखवण्यासाठी सरपंचाने हा बनाव केला होता असे लोक तेव्हापासून आतापर्यंत याप्रकरणी ठामपणे बोलत आहेत. गावात अटीतटीच्या निवडणुकीत वाद निर्माण झाले होते. अशा स्थितीत सरपंच झाल्यावर रिस्क नको म्हणून सुरक्षेसाठी अगोदर पिस्तुल परवाना मागणी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याला पुष्टी मिळावी म्हणून हा बनाव पुढे करण्यात आला असावा असे गाव परिसरात बोलले जात आहे. (Pistol license)

या प्रकारानंतर पोलिसांनी गावातील व परिसरातील अनेकांना चौकशी साठी बोलावून नाहक त्रास दिला. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचा रंग देण्यात आल्याने काही जण अजूनही आपल्यावर काही बालंट येईल या भीतीने ग्रासलेले आहेत. कोणाच्या सांगण्यावरून पोलीस आपल्याला उचलतील अशी चिंता अनेकांना लागुन आहे.काहीच घेणेदेणे नसताना अनेकजण मानसिक दडपणाखाली आहेत.

एखाद्या नेत्याच्या दबावाखाली पोलीस काम करीत असतील तर येथे सर्वसामान्य व्यक्तीला न्याय कसा मिळणार असा प्रश्न खेड पोलिसांबद्दल निर्माण झाला आहे. या प्रकारातील सत्य समोर यावे व दोषींवर कारवाई व्हावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
चर्चेमुळे व वृत्त प्रसिद्धी मुळे पोलिसांकडून डमी आरोपी उभे करून हा प्रकार गपगार होऊ शकतो अशी भिती देखील काही जण व्यक्त करीत आहेत.

संबंधित प्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे. अडीच महिन्यात कोणत्याही प्रकारचे धागेदोरे मिळालेले नाहीत. मात्र म्हणून आम्ही कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचलो असे होत नाही. कोणाचाही दबाव असण्याचा प्रश्न नाही. प्रकार घडण्यापूर्वी तक्रारदाराचा पिस्तुल परवाण्यासाठी अर्ज दाखल असल्याचे समजते.त्याअनुषंगाने सुद्धा चौकशी होईल. लवकरच सत्य समोर येईल.
-सतिशकुमार गुरव, पोलीस निरीक्षक-खेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT