Brinjal Farming : शेतीत पैसा करायचा असेल तर फायदेशीर वांग्याची शेती करा - पुढारी

Brinjal Farming : शेतीत पैसा करायचा असेल तर फायदेशीर वांग्याची शेती करा

- सत्यजित दुर्वेकर

दैनंदिन व्यवहारात नेहमी उपयोगाला येणारे वांगे हे महत्त्वाचे पीक आहे. कोणत्याही हंगामात आणि कोणत्याही जमिनीत हे पीक घेता येते. त्यामुळे कोणत्याही भागातील शेतकर्‍याला याची लागवड करता येईल. वांगी पिकामध्ये अनेक जाती उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे विविध आकारांमध्येही ते मिळते. (Brinjal Farming)

त्यामुळे वांग्याला नेहमीच चांगली मागणी असते. या पिकाची लागवड करून शेतकरी मित्रांना चांगला आर्थिक फायदाही मिळवता येईल.

विविध भाजीपाला पिकांमध्ये वांगी हे अतिशय महत्वाचे पीक आहे. या पिकाच्या तिन्ही हंगामांसाठी उपयुक्‍त अशा जाती उपलब्ध असल्यामुळे या पिकाची लागवड वर्षभर करता येते. यामुळे शेतकर्‍यांच्या द‍ृष्टीने आर्थिक फायद्याचे पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. वांगी पिकाच्या जातींमध्ये जांभळा, हिरवा, पांढरा असे विविध रंग उपलब्ध आहेत.

Brinjal Farming : पांढरी वांगी मधुमेहासाठी गुणकारी

लांब, गोलाकार, अर्धगोलाकार इत्यादी आकार असल्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशात या पिकाची भरपूर मागणी असते. आहाराच्या द‍ृष्टीने सुद्धा या पिकास महत्त्वाचे स्थान आहे. पांढरी वांगी मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी समजली जातात. या पिकांचे उगमस्थान भारतात असल्यामुळे अनेक सुधारित वाण तयार करण्यासाठी मोठा वाव आहे.

पाण्याचा उत्तम निचरा होणारी सुपीक, मध्यम ते भारी जमीन, ज्या जमिनीमध्ये भरपूर सेंद्रिय पदार्थ आहेत आणि ज्या जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 आहे अशा जमिनीत या पिकाची लागवड करावी.

बाजारात लवकर फळे येण्यासाठी हलक्या वाळूमिश्रित जमिनीची निवड करावी. अत्यंत आम्लयुक्‍त जमिनी या पिकांच्या लागवडीसाठी अयोग्य समजल्या जातात.

वांगी पिकाच्या भरघोस वाढीसाठी उष्ण हवामान मानवते. अतिशय कडाक्याच्या थंडीत या पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो आणि उत्पादनात घट येते.

उशिरा तयार होणार्‍या जाती थोड्या-फार प्रमाणात थंडी सहन करू शकतात. या पिकाच्या उत्तम वाढीसाठी दररोज सरासरी तापमान 13ं ते 23ं सेल्सिअस असल्यास पिकांची वाढ अतिशय चांगली होऊन भरपूर फळे लागतात.

Brinjal Farming : वांग्याच्या अनेक जाती

बाजारात चांगला भाव मिळण्यासाठी आपल्या हवामानासाठी योग्य अशा सुधारित जातींमध्ये प्रामुख्याने पुसा पर्पल लॉग, पुसा पर्पल राऊंड, पुसा पर्पल क्लस्टर, अरुणा, मांजरी गोटा, रुचिरा, प्रगती, पुसा क्रांती, फुले हरित, कृष्णा, पुसा अनुपम इत्यादी जातींची निवड करावी.

या पिकाची लागवड तिन्ही हंगामांत होते. खरिपाची लागवड मे महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा जूनच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. रब्बी पिकासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात लागवड करावी. त्याचप्रमाणे उन्हाळी हंगामासाठी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये गादी वाफ्यावर बियाणांची पेरणी करावी.

गादी वाफा तयार करत असताना जमीन उभी-आडवी नांगरून भुसभुशीत करून घ्यावी. जमीन 4 दिवस उन्हात तापू द्यावी. नंतर त्यात चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. त्यानंतर रोपाच्या आवश्यकतेनुसार, जमिनीच्या उपलब्धतेनुसार गादी वाफ्याची लांबी ठरवावी. शक्यतो गादी वाफ्याची रुंदी 1.2 मीटर किंवा 120 सें.मी. एवढी ठेवावी. गादी वाफ्याचा वरचा भाग एकसारखा समांतर असणे अत्यंत आवश्यक आहे.

गादी वाफ्यावर वांग्याची शेती होते फायदेशीर

साधारणतः 10 ते 15 सें. मी. उंचीचा गादी वाफा तयार करावा. ज्यामुळे गादी वाफ्यावर कोठेही पाणी साचणार नाही आणि पाण्याचा योग्य निचरा होईल. बहुधा पावसाळ्यात गादी वाफ्यावर पाणी साचल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी जास्त पावसाच्या प्रदेशात बुरशीनाशके फवारावीत.

वांगी पिकाच्या लागवडीसाठी हेक्टरी 700 ते 1000 ग्रॅम बियाणे लागते. पीकवाढीच्या काळात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 3 ग्रॅम कॅप्टन किंवा 2 ग्रॅम कार्बेन्डॅझीम प्रतिएक किलो बियाण्यास लावावे.

रोपे स्थलांतरित करण्याच्या आधी शेताची आडवी-उभी नांगरणी करून नंतर ढेकळे फोडून वखारणी करावी. जमिनीत चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 30-40 गाड्या टाकून वखराची पुन्हा पाळी द्यावी. तयार झाल्यानंतर गादीवाफ्यावर झारीच्या सहाय्याने हलके पाणी द्यावे. यामुळे सहजरीत्या रोपे काढता येतील आणि मुळांना इजा होणार नाही.

लागवड कशी टाकावी

सुधारित जातींच्या रोपांची लागवड सरी-वरंब्याच्या वाफ्यामध्ये 7575 सें. मी. आणि संकरित वाण 9075 सें.मी. अंतरावर करावी. दोन ओळींतील आणि दोन रोपांमधील अंतर ठरवताना जमिनीचा प्रकार, हंगाम आणि जातीनुसार लागवडीचे अंतर ठेवावे. वांगी पिकाच्या भरघोस वाढीसाठी आणि चांगल्या प्रतीच्या उत्पादनासाठी जमिनीच्या मगदुरानुसार हेक्टरी 60 किलो नत्र अधिक 50 किलो स्फुरद द्यावे. त्यापैकी अर्धी मात्रा नत्र आणि पूर्ण स्फुरद लागवडीसोबत द्यावी. उरलेल्या नत्राची अर्धी मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावी.

पिकाच्या गरजेनुसार 10-12 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. उन्हाळी हंगामात पाण्याच्या पाळ्या 8-10 दिवसांनी द्याव्यात. जमिनीच्या मगदुरानुसार हा कालावधी कमी-जास्त करावा. पिकांची वाढ निरोगी आणि जोमाने होण्यासाठी आवश्यकतेनुसार 2-3 वेळा कोळपणी आणि निंदणी करून जमीन तणविरहित ठेवावी. यामुळे पिकास योग्य प्रकारे अन्‍नपुरवठा होऊन फळधारणा चांगली होते.

उथळ आंतरमशागत करावी, ज्यामुळे पिकाच्या मुळांना इजा होणार नाही.

बी पेरणीपासून 80 ते 100 दिवसांत फुलोर्‍यावर येते आणि प्रथम काढणीस जातीपरत्वे 120 ते 130 दिवसांत तयार होते.

या पिकाचे आयुष्य 200 दिवसांपर्यंत असते. विविध जातींनुसार हा कालावधी कमी-जास्त राहू शकतो.

पीक काढणीस तयार झाल्यावर दर 8-10 दिवसांनी फळांची काढणी करावी. अशा प्रकारे साधारणतः 10-12 काढण्या मिळतात.

याला बाजारात नेहमीच मागणी असल्याने शेतकर्‍यांना या पिकाची लागवड करून चांगले आर्थिक उत्पन्‍नही मिळवता येईल.

Back to top button