पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवानंतर आता आनंदाने, उत्साहाने नवरात्रौत्सव साजरा होणार असून, सगळीकडे चैतन्याची लहर पाहायला मिळत आहे. यंदा नवरात्रौत्सव 15 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत रंगणार आहे. यावर्षी रविवारी (दि. 15) घटस्थापना होऊन नवरात्रौरंभ होत आहे. यादिवशी चित्रा, नक्षत्र, वैधृती योग असला तरी हे कर्म तिथी प्रधान असल्याने रविवारी ब्राह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे पाचपासून ते दुपारी 1 वाजून 45 मिनिटांपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल, असे दाते पंचागाचे मोहन दाते यांनी सांगितले.
संबंधित बातम्या
नवरात्रौत्सवाला अवघे दोन दिवस उरले असून, उत्सवाची तयारी घराघरांमध्ये, मंदिरांमध्ये आणि मंडळांमध्ये सुरू आहे. 19 ऑक्टोबर रोजी ललित पंचमी असून, 21 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. 22 ऑक्टोबर रोजी महाष्टमीचा उपवास करावयाचा आहे आणि 23 ऑक्टोबर रोजी सोमवारी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ती) आहे आणि 24 ऑक्टोबरला विजयादशमी (दसरा) आहे. सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन आणि दसरा एका दिवशी येतात. मात्र, यावेळेस दसर्याच्या आदल्या दिवशी नवरात्रोत्थापन आहे.
घटस्थापनेपासून दसर्यापर्यंत 9 दिवस किंवा 10 दिवसांचा कालावधी असतो. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे असा फरक असतो. पण, यावर्षी घटस्थापनेपासून नवव्या दिवशी नवरात्रोत्थापन असून, दसरा दहाव्या दिवशी असल्याचे दाते यांनी नमूद केले. ज्यांना 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही. त्यांनी 17 ऑक्टोबर, 19 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी आणि 23 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन करावे, असेही दाते यांनी सांगितले.
दाते म्हणाले, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी 21 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते, त्यामुळे त्यादिवशी महालक्ष्मी पूजन दिलेले आहे. मात्र, दुर्गाष्टमी 22 ऑक्टोबर रोजी आहे. विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन हे 24 ऑक्टोबर रोजी असून, साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. यादिवशी विजय मुहुर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहुर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी 2 वाजून 18 मिनिटे ते 3 वाजून 04 मिनिटांदरम्यान आहे.
15 ऑक्टोबर – घटस्थापना
19 ऑक्टोबर – ललित पंचमी
21 ऑक्टोबर – महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे)
22 ऑक्टोबर – दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास
23 ऑक्टोबर – नवरात्रोत्थापना
24 ऑक्टोबर – विजयादशमी (दसरा)
काही लोकांकडून वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर सणांच्या सुमारास तारखेविषयी संभ्रम निर्माण करणारे मेसेज पाठविले जातात. त्याकडे दुर्लक्ष करावे आणि दसरा 24 ऑक्टोबर रोजी साजरा करावा.
हेही वाचा