Pune Navratri 2023 : मंडप उभारणी, विद्युत रोषणाई अन् फुलांची सजावट | पुढारी

Pune Navratri 2023 : मंडप उभारणी, विद्युत रोषणाई अन् फुलांची सजावट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विद्युत रोषणाईने उजळलेले मंदिर…उत्सव मंडपाच्या उभारणीत व्यग्र असलेले कर्मचारी…फुलांची सजावट करणारे सजावटकार आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनात व्यग्र असलेले पदाधिकारी…असे उत्साही आणि आनंदी वातावरण शहरातील देवीच्या मंदिरांमध्ये पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवाला अवघे दोन दिवस उरल्यामुळे मंदिरांमध्ये उत्सवाची जोरदार तयारी सुरू असून, सजावटीपासून ते विद्युत रोषणाईपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये हर्षोल्हासाची लहर आहे आणि प्रत्येक जण उत्साहाने काम करीत आहे. मंडळांच्या ठिकाणीही उत्सवाची जोमाने तयारी करण्यात येत असून, काल्पनिक महलांपासून ते ऐतिहासिक स्थळांपर्यंतचे देखावे तयार करण्यात आले आहेत.

नवरात्रोत्सवाला रविवारपासून (दि.15) सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी मंदिरांमध्ये आणि मंडळांच्या ठिकाणी तयारीला सुरुवात झाली आहे. फुलांच्या आकर्षक सजावटीसह उत्सव मंडपाची उभारणीही करण्यात आली आहे, तर महिला आणि पुरुष भाविकांसाठी दर्शनासाठीच्या वेगवेगळ्या रांगा करण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी काही देवीच्या मंदिरांमध्ये वेगळे व्यासपीठ उभारण्यात आले असून, भजन-कीर्तनापासून ते प्रवचनांच्या कार्यक्रमांपर्यंतची तयारी पदाधिकार्‍यांकडून येत आहे.

मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, पाण्याच्या सुविधेसह अभिषेक-आरतीसाठी वेगळे दालनांचे कामही सुरू आहे. चतु:शृंगी मंदिर, पुण्यातील ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मंदिर, महालक्ष्मी मंदिर (सारसबागेजवळ), पिवळी जोगेश्वरी मंदिर आदी देवीच्या मंदिरांमध्ये उत्सवाची तयारी पूर्णत्वास आली आहे. मंदिरांमध्ये तर जोमाने तयारी सुरू आहेच. मंडळांच्या ठिकाणीही उत्सवाची तयारी सुरू आहे. उत्सव मंडपाच्या उभारणीसह सजावटीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. काहींनी काल्पनिक मंदिराची सजावट, तर काहींनी ऐतिहासिक स्थळांवर आधारित सजावट केली आहे. तर, मंडळांकडून दहाही दिवस रंगणार्‍या धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचे नियोजनही पूर्ण झाले आहे, दांडिया-गरबाच्या कार्यक्रमांसाठी वेगळे व्यासपीठही उभारण्यात येत आहे.

पिवळी जोगेश्वरी मंदिराचे दिनेश कुलकर्णी म्हणाले, की उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्सव मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच, विद्युत रोषणाईही करण्यात येत आहे. मंदिरातही फुलांची सजावट करण्यात येणार असून, उत्सवात मंदिरामध्ये यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

अंबामाता मंदिर ट्रस्टकडून नवरात्रोत्सवाची तयारी

सुखसागरनगरमधील अंबामाता मंदिर येथील अंबामाता ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. स्व. धनराज राठी यांनी 1993मध्ये अंबामाता मंदिर ट्रस्टची स्थापना केली होती. ट्रस्टने गेल्या 30 वर्षांपासून परंपरा, पूजा-आरती नित्यनेमाने चालू ठेवली आहे. मंदिरात रोज सकाळी आठला व सायंकाळी साडेसातला आरती करण्यात येते.

नवरात्रोत्सवासाठी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, श्री अंबामाता मंदिर ट्रस्टच्या कामकाजाकरिता ट्रस्टी मगराज राठी, रवींद्र राठी, राजेश राठींसह संपूर्ण राठी परिवार, स्वयंसेवक व पोलिस यांच्यामार्फत सर्व कार्यक्रम भक्तिभावाने शिस्तबद्ध, नियोजन पद्धतीने व शांततापूर्वक साजरे करण्यात येणार आहेत. संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, स्वयंसेवक व सिक्युरिटी गार्डची मोठ्या संख्येने नेमणूक करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या 9 दिवसांत विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील विविध भागांतून 9 दिवस भजनी आणि आराधी मंडळी हजेरी लावत असून, या वेळीही त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन आणि हलवापुडीचे वाटप करण्यात येणार असून, दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मगराज राठी यांनी दिली.

हेही वाचा

Manushi Chhillar : मानुषी छिल्लरचा २०२३ मधील अभूतपूर्व प्रवास, २०२४ फॅन्ससाठी सरप्राईज

Pune PMP News : पीएमपीचे तिकीट आता एका क्लिकवर; पीएमपी करणार अ‍ॅप लाँच

पेपर कपमध्ये चहा-कॉफी पित असाल तर सावधान!

Back to top button