दुर्दशा सर्व्हन्टस सोसायटीची! जमिनीचा मामला, विश्वस्तांचा आपसात हमला..

दुर्दशा सर्व्हन्टस सोसायटीची! जमिनीचा मामला, विश्वस्तांचा आपसात हमला..

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राजकारण हे आध्यात्मिक आणि भारत देश समृद्ध व्हावा म्हणून न्यायमूर्ती रानडे यांचे शिष्य व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी सुरू केलेली सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी ही ख्यातनाम संस्था, विद्यमान विश्वस्तांच्या मनमर्जी कारभारामुळे कोर्ट कचेरीच्या जाळ्यात अडकणार आहे. संस्थेची पवित्रता व उद्देशाला काळिमा फासल्यामुळे आता पोलिसांच्या अटकेच्या धाकाने विश्वस्तांमध्ये आपसातच 'हमले आणि मामले' अशी खेळी सुरू आहे.

भारतभर मोक्याच्या ठिकाणी नामदार गोखले यांना जनतेने राष्ट्रीय व सामाजिक कामासाठी जमिनी दान दिल्या होत्या. त्यात उत्तर भारतातील अलाहाबाद प्रांतातील सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीच्या नावाने पेच पेडवा, तुलसीपूरनगर पंचायतच्या हद्दीतील गट नंबर 1735 ची 0.37 हेक्टर जमीन बाजारभाव 74 लाख रु. असताना नाममात्र 17 लाख रु. घेऊन विकली. हा व्यवहार करताना धर्मदाय आयुक्त यांची कुठल्याही प्रकारची संमती घेतली नाही. पण नाममात्र ठराव विश्वस्तांनी घेतला. ज्यामध्ये विक्रीचे अधिकार एकाला व व्यवहार दुसऱ्याने केला.

हरकतीला हरताळ..

सदर विक्री ही धर्मादाय आयुक्त यांच्या परवानगीशिवाय झाल्याने या जमीन विक्री व्यवहारात संस्थेच्या विश्वस्तांनी आपसात अफरातफर केली असावी अशी दाट शंका आहे. कारण या व्यवहारात काही विश्वस्तांनी संस्थेत अध्यक्ष असलेल्या दामोदर साहू यांना याबाबत हरकत घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याला अध्यक्ष दामोदर साहू व मिलिंद देशमुख यांनी हरताळ फासला.

मुख्य सूत्रधार सेक्रेटरी मिलिंद देशमुख

या व्यवहारात मिलिंद देशमुख यांनी सेक्रेटरी म्हणून सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीसाठी व्यावसायिक हेतूने पैशाची अत्यावश्यकता असल्याचे कारण सांगून जमीन विकली आहे असे निदर्शनास आले. ज्या जमिनीला बाजारभाव जवळपास 74 ते 75 लाखांचा असताना ती 17 लाखांना विकली. खरेदीदाराने तीच जमीन काही महिन्यांत 24 लाख रुपयांना दुसऱ्याला विकली. खरेदी-विक्रीच्या दस्तऐवजावर किंचित खाडाखोड दिसून आल्याने या बाबी बऱ्याच शंका उत्पन्न करीत आहेत.

शिवाय या व्यवहारात लाखो रुपयांचा आयकर संस्थेने बुडविला असल्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत चौकशी होणे आवश्यक आहे. कारण या आधी मिलिंद देशमुख यांची आयकर विभागातर्फे चौकशी व्हावी म्हणून आयकर विभागाला स्व.सुनील गोखले यांनी पत्रव्यवहार केला. मात्र, त्याच काळात गोखले यांचा मृत्यू झाला. त्यामुळे ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न मिलिंद देशमुखांनी केला असे ही वर्तुळात वर्तविले जात आहे.

आपसातील हमले आणि मामले..

सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीचे विश्वस्त जमिनीचा मामला आणि आपसात दोषारोपांचा हमला करीत आहेत. कारण यात सचिव मिलिंद देशमुख आणि अध्यक्ष दामोदर साहू व वरिष्ठ सदस्य यांच्या मुलांना संस्थेचे मेंबर करण्यासाठी वाटेल त्या स्तराला जाऊन संस्थेचा पैसा संस्थेच्या उद्देशापेक्षा कोर्टकचेरीच्या नावाने, सरकारी यंत्रणा मॅनेज करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे देशमुख यांच्या विरोधात असलेल्यांच्या माहितीवरून दिसून येत आहे. संस्थेच्या बचावासाठी पुढे आलेल्या व्यक्तींना मिलिंद देशमुख हे खोटे दस्तावेज देऊन तक्रार करीत असल्याचे रानडे ट्रस्टच्या प्रकरणात दिसून येते. त्यामुळे देशमुख यांच्यासोबत अध्यक्ष दामोदर साहू व वरिष्ठ सदस्य अशा त्रिकूटाने संस्थेची पवित्रता व उद्देशाला काळिमा फासल्यामुळे आता पोलिस अटकेच्या धाकाने पुणे मुख्यालयात आपसात मामले आणि हमले अशी खेळी सुरू आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news