Latest

Ecuador elections | ३५ वर्षीय डॅनियल नोबोआ बनले इक्वाडोरचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : उजव्या विचारसरणीचे उमेदवार डॅनियल नोबोआ (वय ३५) यांनी इक्वाडोरच्या राष्ट्राध्यक्षपदाची मुदतपूर्व निवडणूक जिंकली आहे. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत १ कोटींहून अधिक लोकांनी मतदान केले होते. नॅशनल इलेक्टोरल कौन्सिल ऑफ इक्वाडोर (CNE) च्या माहितीनुसार, नोबोआ यांना ५२.३ टक्के मते (४८,२९,१३०) मिळाली आहेत. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी डाव्या पक्षाच्या उमेदवार लुईसा गोन्झालेझ (Luisa González) यांना ४७.७ टक्के मते (४४,०४,०१४) मिळाली असल्याचे CNE ने सांगितले. (Ecuador elections)

संबंधित बातम्या 

नोबोआ (Daniel Noboa) हे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत विजय मिळवलेले इक्वाडोरचे सर्वात तरुण उमेदवार आहेत. नॅशनल डेमोक्रॅटिक अॅक्शन पक्षाचे उमेदवार असलेले ३५ वर्षीय डॅनियल हे अल्वारो नोबोआ यांचे पुत्र आहेत, जे पाच वेळा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अयशस्वी ठरले होते. डॅनियल नोबोआ पुढील निवडणुकीपर्यंत केवळ १७ महिने पदावर राहतील. ते त्यांच्या ३६ व्या वाढदिवसाच्या पाच दिवस आधी २५ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतील.

निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर लुईसा यांनी नोबोआ यांचे त्याच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. लॅटिन अमेरिकन राष्ट्र असलेले इक्वाडोर गेल्या काही दिवसांपासून कमजोर अर्थव्यवस्था, हिंसाचार, वाढती गुन्हेगारी आणि बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे त्रस्त आहे. अशा परिस्थितीत इक्वाडोरमधील मतदारांनी तरुण आणि उद्योजक असलेल्या डॅनियल नोबोआ यांना देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. (Ecuador presidential election)

डॅनियल नोबोआ हे इक्वाडोरमधील राजकारणात सक्रिय आहेत. त्याचबरोबर त्यांना केळी उद्योगातील व्यापारी म्हणून त्यांना ओळखले जाते. २०२१ ते २०२३ दरम्यान ते इक्वाडोरच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य होते.

नोबोआ हे मावळते राष्ट्राध्यक्ष गिलेर्मो लासो यांनी विधिमंडळ विसर्जित करण्याआधी आणि मुदतपूर्व निवडणुका घेण्याआधी खासदार होते. ते नॅशनल डेमोक्रॅटिक ॲक्शन पक्षाचे पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनी तरुणांसाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे, अधिक परदेशी गुंतवणूक आणण्याचे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारीशी लढा देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच करचुकवेगिरी करणाऱ्या शिक्षा आणि अनेक भ्रष्टाचारविरोधी उपाय सुचवले आहेत. (Ecuador elections)

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर पत्रकारांशी बोलताना नोबोआ यांनी त्यांना देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांची पत्नी, आई-वडील आणि देवाचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, "मी त्या सर्व लोकांचे आभार मानतो जे एका नवीन, तरुण, राजकीय प्रकल्पाचा भाग बनले ज्यांचा उद्देश देशाला सुख शांती परत मिळवून देणे हा होता."

"उद्या आम्ही या नवीन इक्वेडोरसाठी काम सुरू करू. देशाला हिंसाचार, भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढून देशाच्या पुनर्बांधणीसाठी काम सुरू करू," अशी ग्वाही नोबोआ यांनी समर्थकांशी बोलताना दिली.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT