पुणे; भाग्यश्री जाधव : 'कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला' पोस्टर शहरात विविध ठिकाणी झळकले आहेत. मात्र, हा वाघ नक्की कोण हे स्पष्ट झालेले नसले तरी यासंबधीची राजकिय वार्ता लवकरच कळणार असा आशय या होर्डिंगवर देण्यात आला आहे. त्यामुळे सेना पुण्यात नक्की कोणता वाघ घेऊन आणि तो नक्की कोणाची शिकार करणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात रंगली आहे. हे पोस्टर पुणे शहरातील मुख्य चौकात एस पी कॉलेजच्या चौकात लावण्यात आले आहे.
पुणे महापालिका निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. पुणे शहरात भाजपची सत्ता आहे. आगामी निवडणुकीत भाजपची सत्ता रोखण्यासाठी शिवसेनेच्या वतीने नक्की कोणता वाघ पुण्यात येणार याकडे लक्ष आहे. शिवसेनेकडे पुणे शहरात नेतृत्वाची पोकळी आहे. आता ही पोकळी भरून काढण्यासाठी राज्यातून कोणता वाघ पुण्यात येणार आणि भाजपची शिकार करणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्या भाजप आणि शिवसेना हा संघर्ष जसा राज्यात पाहायला मिळतो तसाच संघर्ष पुण्यातही पेटला आहे. नुकतेच भाजपचे नेते किरीट सोमय्या पुणे पालिकेत आले असता त्यांना शिवसेनेच्या वतीने धकाबुक्की करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या वतीने किरीट सोमय्या यांचे जंगी स्वागत पुणे पालिकेत करण्यात आले. शिवसेनेचा शिकारी तर ठरलाय पण पुण्यात कोण वाघ येणार हे मात्र कळेना.
हे ही वाचलं का ?