पुणे : कर्वेनगरमध्ये आघाडी व भाजपमध्ये रस्सीखेच

पुणे : कर्वेनगरमध्ये आघाडी व भाजपमध्ये रस्सीखेच
Published on
Updated on

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : प्रभाग क्रमांक 36 मध्ये (कर्वेनगर) भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत होणार असून, महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र लढल्यास अटीतटीचा सामना पाहावयास मिळेल. प्रभागात परिवर्तन होणार का, या चर्चेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
जुना प्रभाग 31 मधील (कर्वेनगर) सुमारे 80 टक्के भाग आला असला तरी, त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आकाराने लहान झालेल्या नव्या प्रभाग 36 चा (कर्वेनगर) सुमारे 95 टक्के भाग व्यापला आहे. जुन्या प्रभाग बारामधील (मयूर कॉलनी डहाणूकर कॉलनी) पाच टक्के भाग नव्या प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे.

चौकाचौकात परिवर्तन आघाडीचे फलक

काही स्थानिक नगरसेवकांविरुद्ध येथील सर्व पक्षांतील दहा-बारा प्रमुख कार्यकर्त्यांनी परिवर्तन आघाडी स्थापन केली. प्रभागाचा विकास झाला नाही, असा मुद्दा मांडत त्यांनी प्रस्थापितांविरुद्ध प्रचार सुरू केला. परिवर्तन आघाडीचे फलक चौकाचौकात झळकले आहेत. त्यामुळे प्रभागात आपोआपच राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपने या प्रभागात चांगले यश मिळविले. त्यापूर्वी मनसेचे नगरसेवक या प्रभागातून निवडून आले होते. जुन्या प्रभाग 31 मध्ये भाजपचे राजा बराटे, सुशील मेंगडे आणि वृषाली चौधरी, तर चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या लक्ष्मी दुधाने हे चौघे जण निवडून आले होते. या वेळी भाजप व राष्ट्रवादी यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षित असली तरी, आघाडी झाल्यास, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या उमेदवारांशी लढा देताना भाजपची दमछाक होणार आहे.

विद्यमान भाजपचे

भाजपकडून राजा बराटे, सुशील मेंगडे, वृषाली चौधरी हे तीन नगरसेवक तसेच महेश पवळे, सोमनाथ गुंड, शिल्पा सचिन फोलाने, अ‍ॅड. प्राची विश्वनाथ बराटे इच्छुक आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेविका लक्ष्मी दुधाने, स्वप्नील दुधाने, संतोष बराटे, संगीता बराटे, प्रमोद शिंदे, बंडू तांबे हे प्रमुख इच्छुक आहेत. काँग्रेसकडून विजय खळदकर यांनी गेल्या निवडणुकीत चांगली लढत दिली होती, ते या वेळीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

शिवसेनेकडून अजय भुवड, सचिन थोरात, नंदू घाटे, जगदीश दिघे, दिनेश बराटे निवडणूक लढवू इच्छितात. मनसेकडून सचिन विप्र, शैलेश जोशी, कैलास दांगट, सुरेखा मकवान, संजय नांगरे हे प्रमुख इच्छुक आहेत. महाआघाडी झाल्यास तिन्ही पक्षांचे एकत्रित पॅनेल उभे राहील. त्याची एकत्रित ताकद ही प्रभागातील काही जागा जिंकू शकेल. कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने, उमेदवार निवडीवरून कार्यकत्र्यांत नाराजी पसरणार आहे. त्याचा फटका अनेक प्रभागांत बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्वेनगरमध्ये आघाडी व भाजप यांच्यात अटीतटीची लढत पाहावयास मिळणार आहे.

अशी आहे प्रभागरचना

कर्वेनगर, स्टेट बँक नगर, हिंगणे होम कॉलनी, इंगळेनगर, कमिन्स कॉलेज, तपोधाम, काकडे सिटी, कल्पतरू कॉलनी, अमृत कलश सोसायटी, ज्ञानदीप कॉलनी, मयूर कॉलनी,श्रमिक वसाहत, चंद्रलोकनगरी, डहाणूकर कॉलनी, वनदेवी मंदिर, कामना वसाहत, हिंगणे बुद्रुक, मावळे वस्ती, मनोदय कॉलनी, एकता कॉलनी, आनंदनगर हे भाग प्रामुख्याने येतात. वारजे महामार्ग ते राजाराम पूल, वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते लक्ष्मीनगर झोपडपट्टी, कर्वेनगरमधील सर्व गल्लीचा भाग या प्रभागाच्या हद्दी आहेत.

  • लोकसंख्या – 67260
  • अनुसूचित जाती – 4792

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news