कोरोना विरोधातील लसीकरण मोहिमेत भारताने विक्रमी कामगिरी केली आहे. भारताने आज तब्बल १०० कोटी डोसचा विक्रमी टप्पा पूर्ण केला आहे.
कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाचे अभियान भारतात सुरू करण्यात आले होते.
गेल्या नउ महिण्यांपासून हे अभियान अविरत सुरू आहे. आज (२१ ऑक्टोबर) रोजी तब्बल १०० कोटी डोस देण्याचा ऐतिहासिक टप्पा भारताने पूर्ण केला आहे.
भारतासारख्या खंडप्राय देशात अनेक गोष्टींचा अडथळा पार करत कोरोना विरोधातील लढाईत लसीकरण हा एक महत्वाचा भाग होता. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, हात धुण्या सोबतच नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे केंद्र तसेच राज्य सरकारने आवाहन केले होते.
लसीकरणामुळे कोरोना रूग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणामध्ये घट झाल्याचे चित्र दिसून आले. अशावेळी देशाने १०० कोटी डोसचा पल्ला गाठल्याने ही विशेष बाब समजली जात आहे.
कोरोना विरोधातील १०० कोटी लसींचा टप्पा पूर्ण केल्याने केंद्र सरकारकडून उत्सवाची तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान या कामगिरीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ट्विटरवर खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.