मुंबई, पुढारी ऑनलाईन : मंगळवारी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या ही ३५३ वर गेलेली असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्यस्थितीला मुंबईत ३ हजार ७१८ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) आलेली आहे, असं म्हंटलेलं आहे.
नागपूरचे पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनीही नागपूरमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याचं सांगितलेलं असताना आता मुंबईत तिसरी लाट आल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेली आहे. दोन दिवसांवर आलेला गणेशोत्सव साजरा करताना गर्दी करू नका, असं आवाहन पेडणेकर यांनी केलेलं आहे.
गणेशोत्सव साधेपणाने करण्याच आवाहन करत राज्य सरकारने एसओपी जाहीर केलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर पेडणेकरांनी हे भाष्य महत्वपूर्ण आहे. त्या म्हणाले की, "कोरोना तिसरी लाट (Corona third wave) येणार नसून ती आलेली आहे. त्यामुळे सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे." कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून पेडणेकरांनी हे वक्तव्य केलेलं आहे.
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळातील संभाव्य गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मंडपात दर्शन घेण्यास बंदी, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव, रात्रीची संचारबंदी असे काही निर्बंध लागू करण्यात येणार असून, याबाबतची नियमावली दोन-तीन दिवसांत जाहीर करण्यात येण्याचे संकेत आहेत. अशी माहितीही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलेली होती.