Mission Admission : अकरावी प्रवेशाचा कट ऑफ यंदा घसरला

Mission Admission : अकरावी प्रवेशाचा कट ऑफ यंदा घसरला
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शहरस्तरीय केंद्रीय अकरावी ऑनलाईन प्रवेशाची निवड गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर झाली. यंदा प्रथमच सर्व शाखांचा कट ऑफ 2 ते 6 टक्क्यांनी घसरला आहे. पहिल्या फेरीत प्रवेशासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांचा ओघ कमी झाल्याने कनिष्ठ महाविद्यालये पूर्ण क्षमतेने भरणार नाहीत, अशी माहिती अकरावी प्रवेश प्रक्रिया (Mission Admission) समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शैक्षणिक वर्ष 2009 पासून अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. 2019-20 पासून अंशत: ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया (Mission Admission) राबविण्यात येत आहे. शहरातील 34 कनिष्ठ महाविद्यालयातील 14 हजार 680 प्रवेश जागांसाठी 25 ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यावर्षी 9 हजार 810 अर्ज प्राप्त झाले. छाननीत 84 अर्ज बाद झाल्याने 9 हजार 726 विद्यार्थी राहिले आहेत. यावर्षी 66 टक्के अर्ज आले असून 34 टक्के कमी झाले आहेत. ही निवड गुणवत्ता यादी प्राप्त अर्ज, मंजूर तुकड्या क्षमता, गुणवत्ता, पसंतीक्रम, आरक्षणानुसार तयार करण्यात आली आहे.

पहिल्या फेरीसाठी 7 हजार 356 विद्यार्थी लॉट केले आहेत. 366 विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन, इनहाऊस व अल्पसंख्यांक कोट्यातून प्रवेश घेतला आहे. 2004 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेला नाही. निवड यादीबाबत विद्यार्थ्यांना 8 सप्टेंंबरपर्यंत ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. मंगळवारी वाणिज्य, विज्ञान शाखेसाठी आलेल्या 12 तक्रारी अमान्य करण्यात आल्या.

निवड गुणवत्ता यादीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान (1.50) वाणिज्य इंग्रजी व मराठी (2 ते 6), कला मराठी व इंग्रजी (2 ते 3) टक्के कट ऑफ घसरला आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांना 8 ते 15 सप्टेंबरपर्यंत मूळ कागदपत्रांसह कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी कोव्हिड प्रमाणपत्र अपलोड

अकरावी प्रवेश प्रक्रियेंतर्गत छाननीत 84 विद्यार्थ्यांचे अर्ज बाद झाले. 35 विद्यार्थ्यांनी गुणपत्रक व दाखला दोनवेळा अपलोड केला. यासंदर्भात विद्यार्थ्यांना फोन करूनही पुन्हा तीच चूक केली.

काहींनी जातप्रमाण व हमीपत्र न जोडल्याने त्या प्रवर्गाचा संबंधित विद्यार्थ्यांना लाभ देता आला नाही. ईडब्ल्यूएसच्या दहा जागा रिक्त ठेवाव्या लागल्या. काही विद्यार्थ्यांनी तर कोव्हिडचे प्रमाण अपलोड केल्याने त्यांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news