मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडू | पुढारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडू

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा : मंदिरे उघडायची की आरोग्य मंदिरे, असा सवाल विरोधकांना करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट सांगितले की, सध्या आरोग्य मंदिरेच उघडली जातील. आम्ही मंदिरे उघडणार आहोत पण टप्प्याटप्प्याने!

कोविडचा काळ अद्यापही ओसरलेला नाही. जबाबदारीने वागा, असे मंगळवारीच मी सर्व पक्षांसह माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. जबाबदारीने आपण वागलो नाही तर लोक कसे वागतील ? हे मी त्यांना सांगितले आहे. आज मंदिरे जरी बंद असली तरीही आरोग्य मंदिरे असेच ज्यांचे वर्णन केले पाहिजे ती रुग्णालये सुरू आहेत. रुग्णालयांच्या माध्यमातून ही आरोग्यमंदिरे सुरू आहेत. त्यामुळे जनता आशीर्वाद देणार आहे.

आरोग्यकेंद्र महत्त्वाचे आहे ते बंद करून मंदिर उघडायचे का ? आम्ही मंदिरे उघडणार आहोत. पण काही गोष्टी टप्प्याटप्प्याने करणार आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. बहुप्रतीक्षित कोपर पूल वाहतुकीसाठी खुला करतानाच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडला.

व्यासपीठावर केंद्रीय मंत्री कपिल पाटील उपस्थित होते. त्यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, कपिलजी तुमच्या परिसरात आरोग्य केंद्र आहे, आज त्याचीच आवश्यकता आहे ना. की आरोग्य केंद्र बंद करून त्याच्याबाजूचे मंदिर उघडू ?

मंदिरे उघडण्यासाठी भाजप आणि मनसेने घंटानाद चालवला आहे. त्याला टोला हाणत उद्धव म्हणाले, भारत माता की जय म्हटल्यानंतर भारत मातेची मुले आरोग्यासाठी तळमळत असतील तर ती भारत माता आपल्याला काय सांगेल ? अरे माझा जयघोष काय करता? माझ्या बाळांकडे पहा. त्यांना औषधे, सोयी-सुविधा द्या. केवळ घोषणा दिल्याने ती बरी होणार नाही. त्यांना बरे कसे करायचे ते बघा, असेही ती म्हणेल. त्यामुळे त्या दिशेनेच आपण पाऊल टाकत आहोत.

कल्याण-डोंबिवलीच्या बॅकलॉगवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,

कल्याण-डोंबिवलीचा बॅकलॉग किती बाकी आहे ? कशामुळे बाकी आहे ? हे पाहायला हवे. पंतप्रधान हे जनतेचे सेवक आहोत. तर आपणही सेवक आहोत. त्यामुळे आपण प्रत्येक भागाला न्याय देणार आहोत.

रवींद्र चव्हाण यांनी आता युतीचे कार्यकर्ते असा उल्लेख केला. जर तुम्ही युतीचे कार्यकर्ते म्हणता तर एकत्र आले पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला बसा एकत्र, चर्चा करा. कल्याण-डोंबिवलीसाठी काय हवे ते मला सांगा. मी कल्याण-डोंबिवलीसाठी जे देता येईल ते मी देत राहणार आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Back to top button