पुढारी ऑनलाईन: जेव्हा मुलं तुमच्या मनाविरुद्ध वागतात, तुमचं काहीच ऐकत नाहीत. अशाप्रसंगी प्रत्येक पालकाला असे वाटत असते की, त्यांना रागवून, आरडोओड करून त्यांना शांत बसवू शकता; पण क्वचित प्रसंगीच पालकांचा हा फंडा उपयोगी पडतो. मुलांवर असा राग व्यक्त करण्याने याचा दीर्घकाळ प्रभाव राहत नाही. त्यामुळे मुलांना ओरडून एखादी सवय किंवा शिस्त लावण्यापेक्षा खालील टिप्सचा अवलंब करुन पाहा. (Children Discipline) बनवा…
तुम्ही तुमच्या घरातील सर्व सदस्यांसाठी वेगवेगळे नियम घालून दिले पाहिजेत. मुलांनाही त्यांचे त्यांच्या क्षमतेनुसार नियम असावेत. या नियमांची लिखित यादी किचनमधील फ्रीजवर किंवा अभ्यासाच्या टेबलाजवळील भिंतीवर लावावी. जेणेकरून तुमची मुले ज्या ठिकाणी सहज पोहचू शकतात, त्यांची नजर जावून ते वाचू शकतात, अशा ठिकाणी ही यादी लावावी.
तुम्ही तुमच्या मुलांच्या चुका, गैरवर्तन कशाप्रकारे हाताळणार आहात, याचे पूर्वनियोजन करा, कारण हे तुमचा आरडाओरडा वाचवू शकते. तुम्ही नियम सांगता तेव्हा मुलांकडून होणाऱ्या चुका, नकारात्मक परिणामांचाही विचार आणि नियोजन करता. त्यामुळे अशा अचानक उद्भवलेल्या प्रसंगी मुलांवर न रागावता, त्यांना त्यांची चूक, गैरवर्तन (Children Discipline) चांगल्या पद्धतीने समजून सांगा.
तुम्ही मुलांसाठी केलेले नियम न पाळल्यास मिळणारी शिक्षा ही लॉजिकल पद्धतीची असावी. त्यांना दिलेले काही अधिकार, महत्त्वाची जबाबदारी तुम्ही काढून घेऊ शकता. तुमच्या मुलांकडून गैरवर्तन किंवा चूक झाल्यास त्याला त्याचा टीव्हीवरील आवडता कार्यक्रम बघण्यास बंदी घालणे, मित्रासोबत खेळायला न सोडणे, दाेन दिवस त्याला/ तिला सायकल वापरण्यास न देणे यामुळे त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होऊन पुन्हा ते तशी चुक करणार नाहीत.
जर तुम्हाला वाटले तुम्ही घालून दिलेल्या नियमांचा परिणाम होत नाही, तर त्यामध्ये सोयीस्कर बदलही करावेत. तुमच्या मुलांच्या वयानुसार, नियमांमध्ये आणि शिस्तीच्या सवयींमध्येही बदल करण्यासाठी पालकांची जागृकता महत्त्वाची आहे. यामुळे लहानपणापासून लागलेल्या शिस्तीच्या सवयी या तुमच्या मुलांमध्ये बदल घडवून आणू शकतात.
मुलांशी संवाद साधताना, नकारात्मक शब्दांपेक्षा अधिक सकारात्मक शब्द वापरण्याचा प्रयत्न करा. "नाही, आता खेळू नका, आता साफसफाई करूया" ऐवजी "होय, चला आता पहिला साफसफाई करूया" असे म्हणणे पसंत करा. तुम्ही "करू नका" पेक्षा अधिक "करू" असे हाेकारार्थी शब्द वापराचे नियम केल्यास तुमच्या मुलांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होण्यास मदत हाेते.
तुम्ही तुमच्या मुलांना काहीतरी वाईट वागताना पकडता, त्यांना रागवता, आणि वेळप्रसंगी शिक्षाही देता, हे तर नेहमीच होत असते. पण तुम्ही मुलांना चांगल्या गोष्टी करताना देखील शोधले पाहिजे. जेव्हा ती चांगली वागतात, एखादी चांगली कृती करतात, तेव्हा त्यांची स्तुती करा. त्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा द्या. नियमांचे पालन करण्यासाठी त्यांच्याकडे सकारात्मक लक्ष द्या.
तुम्ही ठरवलेले नियम केवळ तुमच्या मुलांसाठी नसून, ते कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी असावेत. मुले तुमच्याकडे पाहून अनेक गोष्टींचे अनुकरण करत असतात. तुम्ही त्यांना इतरांचा आदर करण्यास सांगितले आणि तुम्ही तुमच्या जोडीदारावर त्यांच्यासमोर ओरडत असाल, तर त्याचा मुलांवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे मुलांसमोर आपण प्रथम सर्व नियमांबाबत एक आदर्श व्यक्ती असावे.
मुलांशी नेहमी संवाद साधा. त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. त्यांना वेळप्रसंगी कवेत घेवून त्याच्यावरील तुमचे प्रेम व्यक्त करा. ते आणि त्यांची चांगली वागणूक तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे याची त्यांना प्रेमाने जाणीव करून द्या. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांवर ओरडता तेव्हा तुम्ही शिस्त शिकवत नाही, तर तुम्ही त्यांना आणखी बिघडण्यासाठी त्यांच्या मनात चीड निर्माण करता. त्यामुळे तुम्ही जितके शिस्तप्रिय रहाल तितकी तुमची मुलेही शिस्तप्रिय होतील.