स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मुले होतात तणावग्रस्त | पुढारी

स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मुले होतात तणावग्रस्त

लंडन;  वृत्तसंस्था :  जगभरात स्मार्ट फोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाटत आहे. विशेषतः 19 वर्षांच्या मुलांमध्ये स्मार्ट फोनची क्रेझ आहे. ब्रिटनमधील ऑफिस कम्युनिकेशन्सच्या सर्व्हेमधून स्मार्ट फोनबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार ब्रिटनमध्ये 11 व्या वर्षीच 91 टक्के मुलांच्या हाती स्मार्ट फोन येतो. ही मुले 19 वर्षांची झाल्यानंतर ते तणावग्रस्त होतात. अमेरिकेतील 9 ते 11 वर्षांच्या 37 टक्के मुलांकडे स्मार्ट फोन आहेत, अशी माहिती अहवालातून दिली आहे.

युरोपमध्ये 19 देशांतील 13 वर्षांपर्यंत 80 टक्के मुले इंटरनेेटचा वापर करत आहेत. 19 वर्षांचे होईपर्यंत 90 टक्के किशोरवयीन मुलांकडे स्मार्ट फोन आहे. आठ वर्षांचे झाल्यानंतर मुले आपले सोशल मीडिया अकाऊंट तयार करतात. त्यामुळे त्यांना तणाव येण्याची भीती केम्ब्रिज विद्यापीठाचे प्रा. एमी ओर्बन यांनी व्यक्त केली आहे.
स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या वापराचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याचा थेट परिणाम मेंदूवर होऊन त्याला धोका पोहोचण्याची शक्यता अधिक असते, असे ओर्बन यांनी सांगितले.
ओर्बन यांनी 700 मुलांवर केलेल्या संशोधनानुसार 11 ते 13 वयोगटातील मुली आणि 14 ते 15 वयोगटातील मुले सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे ते भविष्यात खूपच निराश होऊ शकतात. सोशल मीडियामुळे मुले स्मार्ट फोनकडे अधिक आकर्षित होतात तर दुसरीकडे सोशल मीडियाचा वापर न करणारी मुले अधिक समाधानी असल्याचे ओर्बन यांच्या संशोधनातून समोर आले आहे.

पालकांनी दक्ष राहण्याची गरज

इंटरनेेट आणि स्मार्ट फोनचा वापर करणे सध्याच्या जगात गरजेचा आहे. त्यामुळे मुलांना समाजातील अनेक घटनांची माहिती मिळते. त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. तरीसुद्धा स्मार्ट फोन अतिवापर धोक्याचा ठरू शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांची प्रतिदक्ष राहण्याची गरज असल्याचे लंडन स्कूल ऑफ इकानॉमिक्सच्या प्रा. सोनिया लिव्हिंगस्टोन यांनी सांगितले.

Back to top button