बारामती : पुढारी वृत्तसेवा
उजनीच्या पाण्यावरून सोलापूरकरांनी वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी. या प्रश्नी कोणी पालकमंत्री बदलण्याची मागणी केली असेल तर मला माहिती घ्यायला हवी. परंतु पालकमंत्री बदलण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. तेच यासंबंधी निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
लाकडी-निंबोडी पाणी योजनेवरून सोलापूरातील विविध पक्ष, संघटनांकडून सध्या आंदोलने केली जात आहेत. हा प्रश्न कमालीचा पेटला आहे. यावरून सोलापूरच्या राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱयांनी चार दिवसांपूर्वी बारामतीत गोविंदबागेत शरद पवार यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर पालकमंत्री बदलले जाणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु उपमुख्यमंत्री पवार यांनी हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असल्याचे सांगत ही शक्यता फेटाळली.
उजनीच्या पाण्याबाबत बोलताना ते म्हणाले, 'उजनीच्या पाण्याचे वाटप पूर्वीच झाले आहे. उपसा सिंचन योजनांसह अन्य पाण्याचे नियोजन झाले आहे. लाकडी-निंबोडी योजना ही त्याच काळातील आहे. परंतु ती रखडली होती. आता तिला प्रशासकिय मान्यता दिली आहे. सोलापूरकरांनी वस्तुस्थिती लक्षात घ्यावी.
निरा खोऱयातील पाणी आपण भीमा खोऱयात टाकून मराठवाड्याला सात टीएमसी पाणी देतो. पाण्याबाबत सगळ्यांनीच समंजस भूमिका घेतली पाहिजे. कारण नसताना गैरसमज निर्माण करून घेवू नयेत. उजनीमुळे सोलापूरकरांच्या जशा जमिनी गेल्या तशा पुणे व नगर जिल्ह्यातील शेतकऱयांच्याही गेल्या आहेत. उजनीचे जास्तीचे पाणी सोलापूरला मिळाले पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.'