जेजुरी : पुढारी वृत्तसेवा
जेजुरीच्या ऐतिहासिक होळकर तलावाकाठी नऊ एकर जागेत नव्याने पालखीतळ विकसित होत असून शनिवारी (दि. 21) श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि पालखी सोहळा समितीच्या वतीने या तळाची पाहणी करून तळ निश्चित केला. वारकरी संप्रदायाचा ध्वज नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांच्याकडे सुपूर्द करून पालखीतळावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
अनेक पिढ्यांपासून संत ज्ञानेश्वर माउलींचा आषाढी वारीचा पालखी सोहळा जेजुरी मुक्कामी असतो. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पालखी सोहळ्यात सहभागी झालेले हजारो वैष्णवभक्त कुलदैवत खंडोबा देवाचे दर्शन घेत असतात. मात्र माउलींच्या पालखी तळासाठी जेजुरीत हक्काची, निश्चित आणि मोठी जागा उपलब्ध नव्हती.
19 जून 2018 रोजी नगरपालिकेच्या वतीने ऐतिहासिक होळकर तलावाकाठी पालखी तळासाठी जागा सुचविण्यात येऊन या जागेची पालखी सोहळा समितीने पाहणी केली होती. 2019 मध्ये नगरध्यक्षा वीणा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली जेजुरी पालिकेत या जागेसाठी ठराव करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही सुमारे नऊ एकर जागा घेण्यात आली.
1 मे 2022 रोजी पालखी सोहळा समिती, आमदार, प्रांताधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभाग यांनी या जागेची पाहणी करून जागेचे सपाटीकरण करण्याच्या सूचना दिल्या. सपाटीकरणानंतर पाहणी करून तळाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले होते.
दरम्यान, शनिवारी (दि. 21) आळंदी संस्थान कमिटीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, चोपदार बाळासाहेब रणदिवे, मालक बाळसाहेब आरफळकर, दिंडी सोहळ्याचे मारुती कोकाटे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, भोर विभागाचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत आदींनी या नवीन पालखी तळाच्या जागेची पाहणी केली.
पालखी तळाची पाहणी केल्यानंतर आळंदी संस्थानच्या वतीने वारकरी संप्रदायाचा ध्वज नगरध्यक्षा वीणा सोनवणे यांच्याकडे सुपूर्द करून नवीन पालखी तळाच्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, मुख्याधिकारी निखिल मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे महेंद्र पाटील, नगरसेवक सचिन सोनवणे, महेश दरेकर, गणेश शिंदे, रुक्मिणी जगताप, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, सुशील राऊत, सासवडचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, जेजुरीचे पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे, पालिकेच्या अधिकारी नेहा गाजरे आदी उपस्थित होते.
जेजुरी येथील नवीन पालखी तळाची पाहणी करताना आळंदी संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा समितीचे प्रमुख.