नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: राजधानी दिल्लीतील मुंडका परिसरात घडलेल्या भीषण अग्निकांडाची न्यायालयीन चौकशीचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिले. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
शुक्रवारी घडलेल्या या घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला. मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये तर, जखमींच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. या घटनेनंतर बेपत्ता असलेल्या जवळपास २९ जणांची यादी समोर आली असून त्यात महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
मृतकांच्या कुटंबियांप्रती सहवेदना व्यक्त करीत मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए तपासणी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अग्निकांडासाठी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे देखील ते म्हणाले. भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी देखील घटनास्थळाला भेट देवून बचावकार्याचा आढावा घेतला. दरम्यान शनिवारी फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळ गाठून पुरावे गोळा केले.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी काही अवशेष मिळाले असून आणखी दोन ते तीन मृतदेह मिळतील अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच मृतकांचा आकडा ३० वर जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीने वेग घेतला. आग लागली तेव्हा इमारतीमध्ये ५० लोकांची एक बैठक सुरू होती. दरवाजा बंद असल्याने ते आत अडकून पडले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अग्निकांडानंत्तर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांसह दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्त समीर शर्मा यांनी दिली आहे.
हेही वाचलंत का?