नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील तीन महानगरपालिकांच्या विलीनीकरणाचा आता मार्ग मोकळा झाला आहे. एमसीडी यूनिफिकेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या आठवड्यातच संसदेत हे विधेयकाची चर्चा आणि मंजुरी सरकारकडून केली जाऊ शकते. अशी माहिती सूत्रांनी दिली.
संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर दिल्लीतील तीन महापालिका संपुष्टात येवून एकच महापालिका राहिल. आणि त्यानंतर पूर्ण शहरासाठी एकच महापौर निवडला जाईल. तसेच सध्या दिल्लीत उत्तर, दक्षिण आणि पूर्व अशा तीन महापालिका कार्यरत आहेत. या महिन्यात महापालिकांसाठी निवडणुका जाहीर होणार होत्या.
दरम्यान, ज्या दिवशी निवडणुकांची तारीख घोषित केली जाणार होती, नेमके त्याच दिवशी केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला पत्र लिहित तारखा घोषित केल्या जाऊ नयेत, असे कळविले होते. तीन महापालिका भंग करून त्याऐवजी एकच महापालिका स्थापणेचा विचार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.
महापालिकांसाठी निवडणुका या 18 मे पूर्वी घेणे आवश्यक आहे, त्यामुळे 16 एप्रिलच्या आधी एकच महापालिका स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. तिन्ही महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. दुसरीकडे निर्धारित वेळेत महापालिका निवडणुका घेण्याच्या विनंतीची याचिका दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
हेही वाचा