मुंबई; पुढारी वृत्तसेवा : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाकडून घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात कांदिवली येथे राहत असलेल्या संस्कृती आणि श्रुती अतुल पारोलिता या मुंबईकर जुळ्या बहिणी टॉपर आल्या आहेत. संस्कृती देशात दुसरी आहे. तर श्रुतीने आठवा क्रमांक पटकावला आहे.
नोव्हेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत जयपूर येथील मधुर जैनने 800 पैकी 619 गुण व 77.38 टक्केवारी मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर मुंबईतील संस्कृती पारोलिया हिने (800 पैकी 599 गुण) 74.88 टक्केवारी मिळवत देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच जयपूर येथील टिकेंद्र सिंगल आणि ऋषी मल्होत्रा यांनी 800 पैकी 590 गुण व 73.55 टक्केवारी मिळवत संयुक्तपणे तिसरा क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेची एकूण टक्केवारी केवळ 9.46 टक्के इतकी आहे. जयपूरच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षांमध्ये बाजी मारली आहे. टॉपर्सच्या यादीत जयपूरचा मधुर जैन पहिल्या क्रमांकावर असून जयपूरचे दोन विद्यार्थी तिसर्या क्रमांकावर आहेत.
पारोलिता कुटुंबातील या जुळ्या बहीणींनी निकालात बाजी मारली आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील, भाऊ आणि वहिनी हे सर्व चार्टर्ड अकाउंटंट आहेत. यासंदर्भात संस्कृती म्हणाली की, आमच्या शालेय शिक्षण घेतानाच आम्ही सीए होण्याचा निर्णय घेतला होता. वडीलांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला सीएचा अभ्यास अवघड वाटला नाही. घरी सर्व सीए असल्याने त्याचा उपयोग दोघींनाही झाला. आम्ही दोघी रोज एकत्र अभ्यास करायचो, महाविद्यालयीन शिक्षण घेताना आम्ही सीएची तयारी केली होती. आता एमबीए पदवी घेण्याचा विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सीए इंटरमिजिएट परीक्षेत मुंबईतील जय देवांग जिमुलिया याने 86.38 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तर तनय भगेरियाने 86 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि ऋषी मेवावाला याने 83.50 टक्के गुण मिळवत देशात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
हेही वाचा :