मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आमदार अपात्रता प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरोपी आहेत. आम्ही त्यांच्यावर अपात्रतेचा खटला दाखल केलेला आहे. अशा परिस्थितीत न्यायमूर्ती आरोपीच्या घरी जाऊन भेटत असतील, तर त्यांच्याकडून कोणत्या न्यायाची अपेक्षा करायची, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
ज्या पद्धतीने या केसची हाताळणी सुरू आहे, त्यावरून लोकशाहीचा खून होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी शंका उपस्थित करत आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणाचा निकाल म्हणजे आपल्या देशातली लोकशाही जिवंत राहणार की नाही, हे ठरवणारा असेल, असेही ठाकरे म्हणाले.
आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवारी दिला जाणार आहे. तत्पूर्वी, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दोन दिवसांपूर्वीच 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीवर ठाकरे यांनी आक्षेप घेत निकालाबात तीव्र नाराजी व्यक्त केली. भेटीची बाब आपण सर्वोच्च न्यायालयाला याचिकेद्वारे निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले.
बिल्किस बानो प्रकरणावरून ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला. हा कोणाचा वैयक्तिक खटला नाही. जुलमी अत्याचार करणार्यांचा अंत हा केलाच पाहिजे, ही शिकवण देणार्या रामाचे मंदिर उभे राहत आहे. त्यामुळे या जुलमी राजवटीचा अंत जनता करेलच, असे उद्धव ठाकरे म्हणाले.