नांदेड; पुढारी वृत्तसेवा : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांचा खून झाल्यानंतर त्यांची संपत्ती आणि व्यवसायावरून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये वाद सुरु झाल्याचे समोर येत असून आता हा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता यांनी त्यांचे दीर प्रवीण बियाणी यांच्यावर व्यवसायाची माहिती चोरल्याचा आरोप केला आहे. तर प्रवीण यांनीही अनिता यांनी मला मारहाण करून धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे.
संजय बियाणी यांनी मागील १०-१५ वर्षांत बांधकाम व्यवसायात मोठी झेप घेतली होती. राज डेव्हलपर्सच्या माध्यमातून त्यांनी नांदेडमध्ये कमी किंमतीत दर्जेदार निवासी संकुलांचे बांधकाम करून मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान बियाणी यांनी व्यवसायाचा आणखी विस्तार करताना मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथेही गृहप्रकल्पांची उभारणी करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलले होते.
५ एप्रिल रोजी शारदानगर येथील घरासमोर बियाणी यांची दोन हल्लेखोरांनी विदेशी बनावटीच्या पिस्तूलमधून गोळ्या झाडून हत्या केली. आणि या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करताना आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक केली असून लवकरच हल्लेखोरही सापडतील असा विश्वास पोलिस अधिकार्यांना पत्रकार परिषदेत व्यक्त केला. बियाणी यांच्या खुनाची उकल होत असतानाच त्यांची पत्नी आणि भाऊ यांच्यामधील संपत्ती, व्यवसाय आणि वारसाहक्कावरून सुरू असलेला वाद वाढला आहे.
शनिवार (दि. ४) रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास प्रवीण बियाणी यांनी आम्हाला कोणतीही कल्पना न देता आमच्या फायनान्सच्या कार्यालयात येऊन तोषिबा कंपनीची एक टीबी क्षमतेची हार्डडिस्क चोरून नेली. या हार्डडिस्कमध्ये आमचा व्यवसाय सुरू झाल्यापासूनचा महत्त्वाचा डाटा आहे. तो नष्ट झाल्यास आमचे मोठे व्यावसायिक नुकसान होणार आहे. त्यामुळे प्रवीण यांच्यावर कारवाई करून हार्डडिस्क परत मिळवून द्यावी, अशी मागणी केली अनिता यांनी केली आहे. तर प्रवीण बियाणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनिता आणि त्यांच्या सोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी राज मॉल समोर मला शिवीगाळ करून मारहाण केली आणि धमकी दिल्याचे म्हटले आहे. यामुळे बियाणी कुटुंबियांच्या व्यावसायिक वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहचल्याने शहरात याची चर्चा सुरु होती.
हे वाचलंत का?