Sanjay Biyani murder case : सातवा हस्तक जाळ्यात; पतियाळा येथून उचलले | पुढारी

Sanjay Biyani murder case : सातवा हस्तक जाळ्यात; पतियाळा येथून उचलले

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : हायप्रोफाईल संजय बियाणी मर्डर केसमध्ये (Sanjay Biyani murder case) पोलिसांनी कुख्यात रिंदाच्या सहा हस्तकांना मंगळवारी अटक केल्यानंतर बुधवारी आणखी एका हस्तकाला पंजाबमधील पतियाळा येथून अटक केली. हरदीपसिंग ऊर्फ हार्डी सपुरे असे या हस्तकाचे नाव असून तो नांदेडचाच रहिवासी आहे. परंतु अटकेच्या भीतीने तो पंजाबमध्ये पळून गेला होता. सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

(Sanjay Biyani murder case) ‘शुटआऊट अ‍ॅट शारदानगर’ प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीपासून गोपनियता पाळली आणि तपासात सातत्य राखले. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांवर या घटनेनंतर चोहोबाजूंनी टीका करण्यात आली. शिवाय संजय बियाणी यांच्या कुटुंबियांना पोलिसांच्याविरुद्ध उभे करण्यात आले. मात्र पोलिसांनी आपला संयम ढळणार नाही, याची खबरदारी घेत प्रकरण तडीस नेण्याचा केलेला प्रयत्न बहुतांशी प्रमाणात यशस्वी ठरला आहे. कोण काय करतंय, तपासात दिशाभूल कोण करतंय, माध्यमात काय छापून येतंय याकडे पोलिसांनी जाणीवपूर्ण दुर्लक्ष करीत केवळ तपासावर लक्ष केंद्रीत केले होते.

मंगळवारी पोलिसांनी सहा हस्तकांना अटक केली आणि बुधवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर करेपर्यंत याची भनक कोणालाही नव्हती. यावरून या प्रकरणात पोलिसांनी पाळलेल्या गोपनियतेचा प्रत्यय येतो. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळेपर्यंत याची वाच्यता कुठेही झाली नाही.

पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. सरकारी वकील व्ही. बी. तोटावार यांनी ११ मुद्यांच्या आधारे न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडून १० दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. न्या. भीनीइम्बिसात देशमुख यांनी ही मागणी मान्य करत आरोपींना १० दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे पोलिसांनी मागणी केली तेवढी कोठडी न्यायालयाने मान्य केली. याचा अर्थ पोलिसांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात सादर केलेले कागदपत्रे, पुरावे हे सक्षम आहेत. अन्यथा अनेक प्रकरणात पोलीस मागणी करतात, त्यापेक्षा कमी दिवसाची कोठडी न्यायालयाकडून सुनावली जाते. परंतु या प्रकरणात असे झाले नाही.

आरोपी न्यायालयात आणल्यानंतर आरोपींच्या वतीने एकही वकील हजर झाला नाही. कोणत्याही वकिलाने आरोपीचे वकिलपत्र स्वीकारले नसल्याची बाब पुढे आल्यानंतर न्यायालयाने आरोपीसाठी वकील नेमण्याचे आदेश दिले होते. साधारणतः आरोपींना रिमांडसाठी मध्यंतरानंतर न्यायालयात आणले जाते. मात्र या प्रकरणात पोलिसांनी सकाळी १० वाजता आरोपीला न्यायालयात आणले होते. यासाठी सकाळी ८.३० पासूनच तयारी सुरु होती. दुपारीची गर्दीची वेळ टाळण्यासाठी पोलिसांनी ही शक्कल लढविली होती.

या प्रकरणातील अटक झालेला सातवा आरोपी हरदीपसिंग ऊर्फ हार्डी सपुरे यास न्यायालयाने १० जूनपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी तानाजी येळगे आणि मोतीराम पवार यांनी हरदीपसिंग सपुरे याला पतियाळा येथून अटक करून नांदेड येथे आणले.

आरोपींना अटक केल्यानंतर २४ तासाच्या आत केव्हाही न्यायालयासमोर उभे करता येते. यासाठी कोणताही नियम किंवा बंधन नाही. आवश्यक वाटल्यास आरोपींना न्यायाधीशाच्या घरी सुद्धा नेऊन सादर करता येते. – अ‍ॅड. पी. एन. शिंदे,

Back to top button