पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचे चाहते त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या घोषणेची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. (Aamir Khan ) त्याने बॉलिवूडला 'लगान', 'थ्री इडियट्स', 'तारे जमीन पर', 'दंगल' सारखे दमदार चित्रपट आपल्या चाहत्यांना दिले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत आमिरने 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' आणि 'लाल सिंह चड्ढा' हे दोन फ्लॉप चित्रपट दिले आहेत. अशा परिस्थितीत चाहते पुन्हा एकदा आपल्या आवडत्या स्टारच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता समोर आलेल्या माहितीसाठी आमिर नेपाळला गेला आहे. (Aamir Khan )
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. फोटोसोबत असा दावा करण्यात आला आहे की, आमिर खान काही दिवसांसाठी मेडिटेशन कोर्स करण्यासाठी नेपाळला पोहोचला आहे. विमानतळाच्या अधिकाऱ्याने ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खान नेपाळची राजधानी काठमांडू येथे असलेल्या बुधानीलकंठा येथील 'नेपाळ विपश्यना' केंद्रात ध्यानधारणेचे बारकावे शिकणार आहे. आमिर ज्या कोर्ससाठी गेला आहे तो १० दिवसांचा आहे. त्यामुळे तो नेपाळमध्ये ११ दिवस घालवणार आहे.