महिलेला सैतानाचा अवतार असल्याचे समजत मांत्रिकाच्या सल्ल्याने तिला नग्न करत अघोरी कृत्य करत तिचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची घटना बारामती तालुक्यातील करंजेपूल येथे घडली. या प्रकरणी तिच्या सासरच्या चौघांसह मांत्रिक अशा पाचजणांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटाोणा प्रतिबंध कायद्यासह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र माणिकराव गायकवाड, राजेंद्र माणिकराव गायकवाड, कौशल्या माणिकराव गायकवाड (सर्व रा. करंजेपूल, ता. बारामती), नणंद निता अनिल जाधव (रा. चाकण, ता. खेड) व तात्या नावाचा मांत्रिक (नाव, पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
करंजेपूलला राहणाऱ्या महिलेने याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. महेंद्र व राजेंद्र हे महिलेचे दीर असून कौशल्या या सासू आहेत. फिर्यादीचा विवाह झाल्यापासून सासू व दीराकडून लग्नात हुंडा जादा दिला नाही या कारणावरून तिचा छळ केला जात होता. वारंवार मारहाण व जाचहाट केला जात होता. नणंद माहेरी आल्यानंतर तिनेही त्यांना भरीस घातले. दोन्ही दीर व सासूने तिला भूतबाधा झाली असल्याचे पसरवत तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलावले. त्याने सांगितल्यानुसार आरोपींकडून लिंबू उतरणे, अंगारे-धुपारे टाकणे, भस्म लावणे, अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडणे, उपाशी ठेवणे असे प्रकार केले गेले.
फिर्यादीला मुलगी झाल्यानंतर सासूने तु पांढऱ्या पायाची असून आमच्या घरी राहू नको, असे म्हणत तिला हाकलून देण्याचा प्रयत्न केला. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी दोन्ही दीर व सासू यांनी घरात कोणीही नसल्याचे पाहून तिला मारहाण केली. तिचे डोके भिंतीवर आपडून लाकडी दांडके, लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. तु सैतानाचा अवतार आहे, तुझा बळी देवू असे म्हणत तिचा गळा जाबून जीव घेण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादीने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. त्याच दिवशी दीर व सासूने तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलावून घेतले. हळदी-कुकंवाचे रिंगण करत त्यात फिर्य़ादीला बसवून नग्न करून अघोरी कृत्य करण्यास भाग पाडले. दीर व सासूने तिच्या तोडात कापसाचा बोळा कोंबून तिला डांबून ठेवले. हा प्रकार पती व मुलाला सांगितले तर तुला मारुन टाकू अशी धमकी दिली. फिर्यादीच्या रडण्याने शेजारी राहणाऱ्यांनी तेथे येत तिची सुटका केली. त्यानंतर फिर्यादीने ही घटना आई-वडिलांना कळवली. माहेरी बारामतीत येत सासरच्या लोकांसह मांत्रिकाविरोधात तिने फिर्य़ाद दिली.
शहर पोलिसांनी हा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलिसांकडे वर्ग केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.