बिद्री: बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी के. पी. पाटील गटाला पहिल्या फेरीत सरासरी ४५९९ आघाडी मिळाली. कारखान्यासाठी अटीतटीने व चुरशीने रविवारी ८९. ३ टक्के मतदान झाले होते. १७३ मतदान केंद्रावर ४९ हजार ९४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रविवारी झालेल्या मतमोजणीत १२० टेबलावर मतमोजणीसाठी सुमारे ६०० अधिकारी व कर्मचारी काम पहात होते. Bidri Sakhar Karkhana Election
प्रारंभी १२० टेबलावर राधानगरी तालुक्यातील ५१ गावे, कागल तालुक्यातील ४८ व भुदरगड तालुक्यातील २१ गावे मोजणीस प्रारंभ झाला. सुरवातीस पेटी खोलून पेटीतील मत पत्रिकेंचे वर्गीकरण करण्यात आले. त्यामध्ये पॅनेलवाईज मते, फुटीर मते व अवैध मतांचे वर्गीकरण १० वाजेपर्यंत झाले. यानंतर प्रत्यक्ष प्रत्येक टेबलावर मोजणी सुरू झाली. प्रत्येक टेबलावर चार मतमोजणी अधिकारी व दोन्ही पॅनेलचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मतमोजणीत राधानगरी तालुक्यातून ए. वाय. पाटील विरोधी आघाडी मोठे मताधिक्य घेईल, असे वाटत होते. मात्र, गट क्रमांक १ मध्ये ए. वाय. पाटील यांना वैयक्तिक मताधिक्य मिळाले. मात्र त्यांच्या आघाडीला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. विद्यमान उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे व ए. वाय. पाटील यांना पराभव स्पष्ट झाला.
मतमोजणीची पहिली फेरी ३ वाजता संपल्यानंतर सव्वा तीन वाजता पहिल्या फेरीतील निकाल निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी जाहीर केला. पहिल्या फेरीत ३५ हजार ४८९ मते मोजण्यात आली. त्यातील ३४ हजार ७३६ वैध मते ठरली. पहिल्या फेरीत ७५३ मते अवैध झाली. राधानगरी गट क्रमांक एकमधून सत्ताधारी आघाडीने २८९९ मतांची आघाडी घेतली.
साडेतीन वाजता दुसऱ्या फेरीला प्रारंभ झाला भुदरगड तालुक्यातील ४२ गावे व करवीर तालुक्यातील २१ गावांची मत मोजणी सुरु झाली आहे.
हेही वाचा