Latest

बेळगाव : वेदगंगा पडली कोरडी; आंतरराज्य करारानुसार पाणी संपले, सीमाभागाला प्रतीक्षा पावसासह माणुसकीची

मोहन कारंडे

निपाणी; मधुकर पाटील : काळम्मावाडीच्या आंतरराज्य पाणी करारानुसार सीमाभागाला वेदगंगेद्वारे सोडण्यात येणारे 4 टीएमसी पाणी पूर्णपणे दिले गेले असून, सध्या वेदगंगा कोरडी ठाक पडली आहे. गतवर्षी यावेळी पाऊस झाल्यामुळे अडचणी कमी होत्या. या वर्षी मात्र पाऊस लांबला आहे, शिवाय करारानुसार हिस्याचे पाणी संपले आहे, त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचा पाण्यासाठी टाहो सुरू असून निपाणी परिसरात तर शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

लोकप्रतिनिधीसह पाटबंधारे विभागाकडून काळम्मावाडी धरण प्रशासनाकडे जरी हिस्याचे पाणी संपले असले तरी माणुसकी म्हणून पाऊस लांबल्याने पुन्हा एक वेळ सीमाभागाला पाणी द्या, अशी विनवणी केली जात आहे. त्यामुळे आता सर्व मदार काळम्मावाडी धरण प्रशासनासह पावसावर अवलंबून आहे.

सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची सर्व तयारी केली आहे. शिवाय सध्या शिवारात ऊस पिकासह शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली आहेत. पण वेदगंगा कोरडी ठाक पडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. यात उष्णतेच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याने परिसरात असलेल्या विहिरीसह कुपनलिकांच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यात वेदगंगा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नदी काठावरील ग्रामपंचायत अंतर्गत राबवण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनाही कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

आंतरराज्य पाणी करारानुसार नोव्हेंबर 2022 ते 31 मे 2023 अखेर दर महिन्याला एकूण 4 टीएमसी पाण्यापैकी वर्गवारीनुसार वेदगंगेत चिखली धरणातून व काळम्मावाडी धरणातून पाणी सोडले जाते. सद्यस्थितीत मे' च्या शेवटच्या टप्प्यातील पाणी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काही दिवस सोडले होते. या पाण्याचा उपसा झाल्याने सध्या वेदगंगा कोरडी पडली आहे. त्यामुळे कोरड्या पडलेल्या वेदंगेत आणखी किती दिवसांनी पाणी येणार याची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे. त्यामुळे या साऱ्याचा विचार करून स्थानिक लोकप्रतिनिधीसह राज्य व केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सीमाभागाला माणुसकी म्हणून काळम्मावाडी धरण प्रशासनाकडून पाणी मिळवून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मागील चार महिन्याच्या कालावधीत करारानुसार ४ टीएमसी पाणी मिळाले आहे. आता पाण्याची गरज असल्याने माणुसकीच्या नात्यातून पाणी मिळावे, अशी मागणी आम्ही केलेली आहे. याशिवाय लोकप्रतिनिधी सुद्धा प्रयत्नात आहेत. पाणी न मिळाल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
– ए. एस. पुजारी, पाटबंधारे अभियंता, निपाणी

गतवर्षी या वेळेला पाऊस पडल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला होता. परंतु या वेळेला वेदगंगा कोरडी ठाक पडल्याने अतिउष्णतेमुळे पिके वाळत आहेत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शिवारात उभी असलेली पिके धोक्यात न येण्यासाठी नदीला पाणी सोडण्याची गरज भासत आहे.
– शंकर पाटील, शेतकरी सौंदलगा

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT