बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू असतानाच भारत आणि जपानी लष्कराची संयुक्त कवायत रविवार, 27 पासून बेळगावात होत आहे. जपानी सैनिक 'धर्म गार्डियन-2022' अंतर्गत मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांबरोबर युध्दसराव करणार आहेत. हा सराव सलग 12 दिवस सराव चालणार आहे.
2008 पासूनच एमएलआयआरसी आणि विदेशी फौजांचा सराव बेळगावात चालतो. याआधीही गेल्या डिसेंबरमध्ये जपानी तुकडीने तीन दिवस सराव केला होता. सरावात जंगल आणि शहरी परिस्थितीमध्ये दहशतवादविरोधी कारवाया कशा कराव्यात, याचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच अनपेक्षित परिस्थिती उद्भवल्यास कसे तोंड द्यावे, याबाबतच्या कल्पनांची देवाणघेवाण होईल.
संयुक्त सरावामुळे भारतीय लष्कर आणि जपानी लष्कर यांच्यातील संरक्षण सहकार्य वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील. लेफ्टनंट कर्नल युझो मसुदा यांच्या नेतृत्त्वाखाली जपानी सैनिक सरावात भाग घेणार आहेत. आतापर्यंत बेळगावात जपान, इस्रायली सैनिकांनी संयुक्त सराव केलेला आहे. 2008 पासून भारतीय लष्कराच्या विदेशी लष्करांसमवेत संयुक्त मोहीमा भारतात तसेच परदेशातही होत आहेत.