बेळगाव

Belgum news | महाराष्ट्राची माणुसकी; चिखली धरणातून वेदगंगेत पाणी

‘दै. पुढारी’च्या पाठपुराव्याला यश ; काळम्मावाडी प्रशासनाचा निर्णय, सीमाभागाला मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

मधुकर पाटील

निपाणी : वेदगंगा नदी कोरडी पडल्याने सीमाभागातील नागरिकांसह शेतकरी पाणीटंचाईच्या गंभीर संकटाला सामोरे जात होते. या पार्श्वभूमीवर ‘दै. पुढारी’ने दि. २४ मेच्या अंकात परिस्थितीवर सविस्तर वृत्त प्रसिद्ध करत पाण्याबाबत आवाज उठविला होता. त्यानंतर लोकप्रतिनिधी, पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश येत काळम्मावाडी धरण प्रशासनाने माणुसकीची भूमिका घेत नानीबाई चिखली (ता. कागल) येथील धरणाचे दोन दरवाजे उघडून वेदगंगेत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता वेदगंगा पुन्हा दुथडी भरून वाहणार असून सीमाभागाला मोठा दिलासा मिळाला आहे.

आंतरराज्य पाणी करारानुसार नोव्हेंबर २०२५ ते ३१ मे २०२६ अखेर कर्नाटकच्या हिश्श्याचे चार टीएमसी पाणी दरमहा वर्गवारीनुसार वेदगंगेत सोडले जाते. मात्र यंदा कडक उन्हामुळे काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने मे महिन्याच्या अखेरीस सोडण्यात येणाऱ्या पाण्यास विलंब झाला होता. परिणामी वेदगंगा पूर्णपणे कोरडी पडली होती.दरम्यान `माणुसकी म्हणून तरी पाणी सोडा’ अशी विनंती लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळम्मावाडी प्रशासनाकडे केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत चिखली धरणातून २०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.विशेष म्हणजे चिखली धरणापासून महाराष्ट्रातील वेदगंगा काठावर उपसाबंदी लागू करून पाणी साठवले जात असून हेच पाणी सीमाभागासाठी उपयोगी ठरणार आहे.

सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी पूर्ण केली आहे.उन्हाळी पिके व ऊसासाठी पाण्याची नितांत गरज असताना वेदगंगा कोरडी पडल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते. उष्णतेमुळे विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळीही कमालीची घटली आहे. नदीकाठच्या अनेक ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.

दरम्यान धरणाचे दोन दरवाजे उघडून सोडण्यात आलेले पाणी सिदनाळ बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यास सुमारे चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.यात हवामान खात्याने अद्याप समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त केलेला नसल्याने हे पाणी सीमाभागासाठी वरदान ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, वेदगंगा पाणीप्रश्नी सातत्याने पाठपुरावा करून प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवल्याबद्दल ‘दै. पुढारी’च्या वृत्ताचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

चार दिवस उपसाबंदीचे आदेश नदी कोरडी पडल्यामुळे आमच्या हिश्श्याचे पाणी मिळाले असले तरी माणुसकीच्या नात्याने काळम्मावाडी धरण प्रशासनाकडे शेवटच्या टप्प्यातील पाणी सोडण्याची विनंती केली होती. आ.शशिकला जोल्ले यांच्यासह महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला.त्याला प्रतिसाद देत वेदगंगेत पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी सिदनाळ धरणापर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचावे यासाठी शनिवारपर्यंत चार दिवस उपसाबंदी लागू करण्याचे आदेश हेस्कॉमला देण्यात आले आहेत.
— आनंद कुलकर्णी,सहाय्यक अभियंता, पाटबंधारे विभाग, निपाणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT