

खटाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील नेर धरणातून गुरुवारी सकाळी उन्हाळी हंगामासाठी तब्बल 130 क्युसेक प्रतिसेकंद वेगाने मुख्य कालवा आणि येरळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. दैनिक ‘पुढारी’सह इतर प्रसिद्धी माध्यमे, सामाजिक तसेच राजकीय संघटना, राजकारणी आणि शेतकऱ्यांच्या लढ्याला उशिरा का होईना यश आल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या भागाच्या लोकप्रतिनिधींनी तांत्रिक बाबींचे सोपस्कार पार पाडून फायनल पंच मारल्याने पाणी सोडण्यातील अडचणी दूर झाल्या.
उन्हाळी हंगामातील पिकांसाठी आणि पाणी पुरवठा योजना सुरळीत चालवण्यासाठी नेरमधून पाणी सोडण्यासाठी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठवला होता. नेरचे पाणी त्वरित सोडण्यासाठी सर्वप्रथम प्रदीप विधाते, राहुल पाटील यांच्या संघटनांनी शेतकऱ्यांसह खटाव येथे तर रयतसह शिवसेना शेतकरी संघटनेने पुसेगावात रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन केले होते.
नेर धरणातील पाणी येरळा नदीपात्रात सोडण्याची मागणी आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नेर तलाव पाणी बचाव संघर्ष समिती, श्री सेवागिरी रयत संघटना तसेच विविध राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली होती. आ. महेश शिंदे यांनी उन्हाळी हंगामात पाणी सोडण्याचे नियोजन करण्यासाठी खटाव येथे शेतकरी मेळावा आयोजित करुन तांत्रिक बाबी आणि अडचणींचा उहापोह केला होता. पाणी सोडण्याचा फायनल पंच याच मेळाव्यात मारण्यात आला होता.
सर्वांच्या प्रयत्नांना गुरुवारी सकाळी यश आले. पाटबंधारे विभागाने आश्वासन दिल्याप्रमाणे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले. आ. महेश शिंदे, डॉ. सुरेश जाधव आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत येरळा नदीपात्रात 100 क्यूसेक तर मुख्य कालव्यात 30 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. हे पाणी पुसेगाव, खातगुण, भांडेवाडी, खटाव, हुसेनपूर आणि सिद्धेश्वर कुरोलीपर्यंत जाणार आहे. या पाण्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
दैनिक ‘पुढारी’ची भूमिका खमकी ...
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच खटाव तालुक्याच्या उत्तर भागात पाणीटंचाई भासू लागली होती. खालावलेली पाणीपातळी आणि उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे चारा आणि बारमाही पिके सुकू लागली होती. पाण्याअभावी शेतात सुकणारे उभे पीक पाहून शेतकरी चिंतेत होते. दैनिक ‘पुढारी’ने नेर धरणातून पाणी सोडण्याची आग्रही आणि खमकी भूमिका सर्वप्रथम मांडली. झालेल्या सर्व आंदोलनांची चांगली दखलही घेतली. पाणी सोडण्यावरुन होणाऱ्या राजकारणाला आणि आरोप प्रत्यारोपांच्या कुरघोड्यांना फाटा देऊन ‘पुढारी’ने शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली. सर्वांच्या रेट्यामुळे उशिरा का होईना पण पाणी सुटल्याने उन्हाळी पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.